जिल्ह्यातील 27 जणांचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी दिल्लीला 

रत्नागिरी:- ओमिक्रॉन धोका डोळ्यासमोर असताना जिल्ह्यात तब्बल २७ संशयित रुग्णांचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत. येत्या ४ दिवसात हे अहवाल अपेक्षित असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा रुग्णालयात २० हजार लिटर्स ऑक्सीजनचा साठा करण्यात आला आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर  राज्यभरात आरोग्य विभागाने पुन्हा निर्बंध लागू केले. शाळा बंद, महाविद्यालये बंद झाली. सर्वत्र लसीकरणाकडे अधिक भर दिलेला असताना जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

कोकण आणि मुंबई हे नातं सर्वश्रृत आहे. कोकणी माणूस मुंबईशी जोडला असल्याने मुंबईत येणे जाणे सतत होत असते. त्यामुळे मुंबईत एखादी साथ आली तर ती साथ कोकणात देखील पसरते. कोरोना बाबतीत देखील अशीच परिस्थिती असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.

रत्नागिरीत मंगळवारी २०३ रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग देखील अधिक अलर्ट झाला आहे. भविष्यात रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल या भीतीपोटी आरोग्य विभागाने आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे.

याबाबत बोलताना डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले की, हे संकेत तिसर्‍या लाटेचे आहेत. तिसर्‍या लाटेला सुरुवात झाली आहे. कोकणचे मुंबई कनेक्शन असल्याने अधिक फैलावत असल्याचे मत डॉ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केले.

याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, २८ तारखेला जिल्ह्यात २७ रुग्णांचे सँपल घेण्यात आले. ओमिक्रॉन संशयित रुग्ण असावेत असा संशय असल्याने या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी २९ डिसेंबर रोजी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. फुले यांनी दिली.

पुणे येथे पाठविण्यात आलेले २७ रुग्णांचे सँपल हे ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लवकरच त्याचे अहवाल प्राप्त होतील असे डॉ. फुले यांनी यावेळी सांगितले.

या २७ जणांमध्ये तिघे जण हे परदेशी रिटर्न असून तिघेही पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांचा अहवाल ओमिक्रॉन तपासणीसाठी पाठवला असल्याचे डॉ. फुले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान जिल्हा रुग्णालय सज्ज असून ऑक्सीजनचा साठा देखील मुबलक असल्याचे डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
महिला रुग्णालयात एक महिना पुरेल एवढा ऑक्सीजनचा साठा करण्यात आला आहे. कोल्हापूर गॅस कंपनीमार्फत हा ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. १ महिना पुरेल इतका ऑक्सीजन महिला रुग्णालयात असल्याने भविष्यात तिसरी लाट उद्भवली तरी त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

२७ रुग्णांचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी दिल्ली येथे गेले असल्याने हे अहवाल चार दिवसात अपेक्षित आहेत. मात्र आरोग्य यंत्रणेने अहवाल येण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसेच लसीकरणावर देखील अधिक भर दिला आहे.

ज्या व्यक्ती बाहेरुन गावात येत असतील तर अशा व्यक्तींची नोंदणी केली जात आहे असे जिल्ह्याबाहेरुन येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण झाले आहे का याची पडताळणी केली जात आहे. ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.

दरम्यान हवामानात झालेले बदल, त्यातच पारा खाली उतरल्याने हुडहुडी भरविणारी थंडी सर्वत्र पडू लागली आहे. या थंडीत सर्दीचे रुग्ण देखील वाढू लागले आहेत. सर्दी झालेल्या रुग्णांच्या पोटात सध्या भीतीचा गोळा असून दोन-चार दिवसात सर्दी बरी झाली नाही तर कोरोना तपासणी करण्याची वेळ त्या रुग्णांवर आली आहे.