पहिल्याच दिवशी दीड हजार जणांना बुस्टर डोस

रत्नागिरी:- फ्रंटलाईन वर्कर, साठ वर्षे आणि त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांच्यासाठी कोरोना लसीकरणा प्रिकॉशन डोसला सोमवारपासून (ता. 10) सुरवात झाली. जिल्ह्यात पहिल्या दिवशी 1 हजार 504 जणांना बुस्टर डोस देण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 15 ते 18 वर्षांखालिल मुलांना कोरोना प्रतिबंधित लस देण्यास सुरवात केली आहे. तिसर्‍या लाटेमध्ये साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त लोकांना दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने या लोकांसाठी बुस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे. याचा आरंभ कोकणनगर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. रत्नागिरीतील पोलिस मुख्यालय येथेही पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी केंद्र ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींचे डोस ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकुण 170 ठिकाणी लसीकरण सत्र सुरु होती. डॉ. आठल्ये यांनी लसीकरणांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्याबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. सूर्यवंशी, डॉ. आर. बी. शेळके, डॉ. महेंद्र ज्ञा. गावडे, डॉ. अजित पवार आदी उपस्थित होते. नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्हयात आतापर्यंत कोविड लसीकरणाचे पहिल्या डोसची मात्रा 10 लाख 25 हजार 983 जणांनी घेतली आहे. हे प्रमाण 94.83 टक्के आहे. दुसर्‍या डोसची मात्रा 7 लाख 29 हजार 135 असून हे प्रमाण 71.07 टक्के आहे. एकूण 17 लाख 55 हजार 118 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले पात्र (15 ते 18 वर्षे वयोगटातील) लाभार्थीचे एकूण 21 हजार 346 जणांना मात्रा देण्यात आली असून हे प्रमाण 29.75 टक्के आहे.

पाच मुलांना वाटू लागले अस्वस्थ

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी केंंद्रावर 15 ते 18 वर्षांखालिल वयोगटातील लसीकरणावेळी लस घेतल्यानंतर पाच मुलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना बरे वाटू लागल्यानंतर घरी सोडण्यात आले. याला तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.