जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार ‘प्रभारींच्या’ हाती 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्याकडे तर माध्यमिकचा पदभार कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. सध्या प्राथमिक शिक्षण विभागातील आठ गटशिक्षणधिकारी पदे रिक्तच आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची उपसंचालकपदी पदोन्नती झाल्यामुळे माध्यमिक आणि प्राथमिकची पदे रिक्त झाली होती. त्यांच्याजागी कुणाचीही नियुक्ती केलेली नव्हती. जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील चार उपशिक्षणाधिकारी पदेही रिक्त आहेत. त्यामुळे पदभार कोणाकडे देणार याकडेच लक्ष लागले होते. शिक्षणविभागातील बरीचशी पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कारभार चालवताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. तरीही गुणवत्तेवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रमुख अधिकारी घेत आहेत. श्रीमती वाघमोडे यांच्या बढतीनंतर कोकण आयुक्तांकडून आलेल्या पत्रानुसार डाएट प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांची प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी प्रभारी म्हणून नेमणुक केली आहे. त्यांनीही अजुन पदभार स्विकारलेला नाही. डॉ. पाटील यांनी शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्याकडे पदभार राहीला तर शिक्षकांसाठी वेगवेगळे उपक्रम ते राबवू शकतात. तसेच माध्यमिकच्या प्रभारी पदावर कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे पदभार दिला आहे. तेही लवकरच पदभार स्विकारणार आहेत. श्री. आंबोकर हे रत्नागिरीत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून तीन वर्षे होते. त्यांनीही चांगल्या पध्दतीने कामकाज चालवले होते.