गो. जो. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांचे निधन

रत्नागिरी:- येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य , मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ . सुभाष देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले . निवृत्तीनंतर ते राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक अनुसंधान कार्य तसेच महाविद्यालयांचे मूल्यांकन करणारी ‘ नॅक ‘ या संस्थेच्या कार्याशी संबंधित होते . देव सर या नांवाने रत्नागिरीसह राज्यात व राज्याबाहेर ते प्रसिद्ध होते. 

  अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणारे देव सर यांनी सुरुवातीला काही काळ ग्रंथालयात रेफरी म्हणून सेवा केली . या पदाची जबाबदारी सांभाळताना विद्यार्थी व अध्यापकांना योग्य आणि उत्कृष्ट पुस्तके सुचविण्यातून त्यांच्या स्वतःच्या मनात ग्रंथालयाच्या विकासाबाबत कल्पना तयार झाल्या , त्या प्राचार्यपदाच्या काळात त्यांनी यशस्वीपणे राबविल्या . एक लाखाहून अधिक ग्रंथसंपदा असणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘ बाबुराव जोशी ग्रंथालया’त कोणत्याही विषयावरील पुस्तके ते चटकन सुचवू शकत असत . अध्यापकीय काळात त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले होते . याबरोबरच अन्य विषयांचा त्यांचा अभ्यासही नवल वाटावे इतका सूक्ष्म असे . विशेष म्हणजे महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांबाबत त्यांची अत्यंत समतोल वागणूक असे . सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांशी आपुलकीने वागणारे देव सर अत्यंत वक्तशीर होते . कोणत्याही कार्यक्रमाला दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते . 

                                             प्राचार्य असताना त्यांनी राबविलेल्या अनेक योजना आणि विद्यार्थीभिमुखता यामुळे महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलून गेला होता . विविध विषयांची जाणकारी आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती यामुळे त्यांच्या प्राचार्यपदाच्या काळात महाविद्यालयाचा दर्जा उंचावला . कोंकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘ कोंकण टॅलेंट सर्च ‘ ( केटीएस ) या परीक्षेत त्यांची भूमिका मध्यवर्ती होती . महाविद्यालयात विज्ञान मंच ‘ सारख्या योजना राबवून त्यांनी जिल्ह्यातील बुद्धिमान आणि होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची अधिकाधिक ओळख होण्यासाठी प्रयत्न केले . गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत विविध नामवंत संशोधन संस्थांच्या साहाय्याने उत्तमोत्तम प्रयोगसाहित्य आणि उपकरणे मिळविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले . 

    ‘राष्ट्रीय सेवा योजना ( NSS ) ‘ हे त्यांच्या आवडीचे एक क्षेत्र असून त्यांच्या कारकिर्दीत ‘ एनएसएस’ची दोन महाशिबिरे महाविद्यालयात झाली होती . विविध विषयांवरील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय परिसंवाद व चर्चासत्रे यांचे आयोजन , ग्रंथालयाच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनुकूलता यामुळे त्यांच्या कारकिर्दीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा चहूबाजूंनी विकास झाला .

महाविद्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण आणि इमारतींचा विस्तार यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते . महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उत्तमोत्तम पुस्तके यावीत यावर डॉ . देव यांचा कटाक्ष असे . महाविद्यालयात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मार्गदर्शनाचे वर्गही त्यांनी सुरू केले होते . निवृत्तीनंतर शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या नवीन महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले , तसेच त्यासाठी देणगीही दिली होती . त्यांच्या अकस्मात निधनाने रत्नागिरी शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे .