रत्नागिरी आरटीओ सुबोध मेडसीकर यांची सिंधुदुर्गात बदली

रत्नागिरी:- रत्नागिरी आरटीओ सुबोध मेडसीकर यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आली आहे. नुकताच त्यांना रत्नागिरी कार्यालयाकडून निरोप समारंभ करण्यात आला. 

आरटीओ सुबोध मेडसीकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली असून ते शुक्रवारी रत्नागिरी कार्यालयातून कार्यमुक्त झाले. या निमित्ताने आरटीओ कार्यालयात पहिल्यांदाच सर्व कर्मचार्‍यांच्यावतीने निरोप समारंभ सदीच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरटीओ सुबोध मेडसीकर यांचे कार्यालयात प्रवेश होताच  सर्व कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत केले तर सुरुवातीला मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव यांनी प्रस्तावना केली.या नंतर सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी कार्यालयाच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून तर त्यानंतर सर्व सहाय्यक वाहन निरीक्षक, सर्व कार्यालयीन लिपीक वर्ग यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

शासकीय सेवेत आल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर बदली होतच असते, मात्र आज माझी सिंधुदुर्ग येथे बदली झाल्यानंतर इतक्या वेगळ्या पध्दतीने सगळ्यांनी एकत्र येत हा निरोप समारंभ ठेवला हे प्रेम, जिव्हाळा पाहून मी भारावून गेलो आहे माझ्या कारकीर्दीतील हा अविस्मरणीय क्षण असल्याचे उद्गार आरटीओ सुबोध मेडसीकर यांनी काढले.

शिस्तबध्द आणि प्रामाणिक अधिकारी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे सुबोध मेडसीकर सर होय अशी प्रतिक्रिया मंगेश नाईक यांनी व्यक्त केली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे, अमोल कदम, सत्यजित खाडे, मिलिंद सावंत तसेच सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत भोसले यांनी केले.