महावितरणकडून गोरगरीब शेतकऱ्यांची लूट

पंचायत समितीच्या बैठकीत आरोप; नियमित बिल आकारण्याचा ठराव 

रत्नागिरी:- महावितरणकडुन गरीब शेतकऱ्याला भरमसाठ व्यावसायिक बिले देऊन कंपनीकडुन पैसे उकळले जात आहेत. हे सर्व रद्द करून पुर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना नियमित कृषीपंपाची बिले आकरली जावी, असा ठराव पंचायत समितीच्या मासिकसभेत घेण्यात आला.

सदस्य सुनिल नावले यांनी हा विषय उपस्थित केला. मात्र यावेळी महावितरणचे अधिकारी गैरहजर होते.
पंचायत समितीची मासिकसभा संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या उपस्थित झाली. आजच्या सभेला अनेक खातेप्रमुक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. तर अनेक खातेप्रमुखांकडे विषेश किंवा नवीन माहिती नसल्याने सभा आटोपती घेण्यात आली.

आरोग्य विभागाचा आढावा देताना संबंधित अधिकारी म्हणाले, तालुक्यात ५० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.   तर १५ ते १८ वयोगटातील १ हजार ०१२ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगितले. तालुक्यात एकही ओमाक्रॉनचा रुग्ण नाही. पहिला आणि दुसरा डोस घेतलेले एकुण ३ लाख ४२ हजार जण आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जास्तीत जास्त चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. मात्र सर्दी-ताप, खोकला असल्यास तत्काळ तपासणी करून पुढील उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील १२८ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एकही नमुना दुषित आढळलेला नाही. कोणत्याही नमुन्यांमध्ये २० टक्के पेक्षा जास्त क्लोरिन
नाही.

विषयपत्रिकेवरील सर्व विषय संपल्यानतंर आयत्या वेळच्या विषयामध्ये सदस्य आणि माजी सभापती सुनिल नावले यांनी महावितरणच्या बिलांचा गंभीर विषय सभागृहापुढे आणला. तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी बिले नेहमी प्रमाणे न पाठविता व्यावसायिक बिलं पाठविली आहेत. त्यामुळे भरमसाठ आणि शेतकऱ्यांकडुन पैसा उकळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे कंपनीने ही बिले रद्द करून पुर्वी प्रमाणे कृषीपंपांची बिले आकारावी, असा ठराव सभेत घेण्यात आला.


पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान 

कालच्या पत्रकार दिनानिमित्त आज पंचायत समितीच्या सभागृहाने सर्व पत्रकारांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपस्थित सर्व
पत्रकारांचा सभापती, उपसभापती, सदस्यांमार्फत झाडा रोप, पेन देऊन यतोचित सत्कार करण्यात आला.