रत्नागिरी शहरातील ६ अतिक्रमणावर हातोडा

कीर्तिनगरात कारवाई ; नागरिकांकडून स्वागत

रत्नागिरी:- शहरातील कीर्तिनगर येथे रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटविले. अनेकांनी अतिक्रमण करून पक्की शेड, पायऱ्या, कंपाऊंड घातले होते. याबाबत तक्रारी वाढू लागल्याने आज पालिकेच्या अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग आणि टाऊन प्लॅनर यांच्या संयुक्त कारवाईने रस्ता मोकळा करण्यात आला.

रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. मात्र त्यांना राजकीय आश्रय असल्याने वारंवार त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळी, मारूती आळी, गोखले नाका, तेलीआळी, मुख्य रस्ता आदी ठिकाणी ही अतिक्रमणे आहेत. मात्र कोणत्याही सत्ताधाऱ्याने ही अतिक्रमणे हटविण्याचे धाडस केलेले नाही. गेल्या महिन्यात २७ तारखेला शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांची मुदत संपली. त्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारी बाबर हेच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. शहरातील कीर्तीनगर येथील रस्त्यावर रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रहदारीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. परंतु त्यावर कारवाई झाली नव्हती. प्रशासक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमन विभागाचे नंदकुमार पाटील, किरण मोहिते, थोरात, भोंगले, बांधकाम विभागाचे इतिराज जाधव, टाऊन प्लॅनर संतोष जाधव आदीच्या संयुक्त पथकाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मोहिमेला पाठिंबा देत अतिक्रमण हटविण्यास सहकार्य केले. पालिकेच्या पथकाने कीर्तिनगर येथील रस्ता आखून त्यामध्ये येणारी अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईने अतिक्रमण करणाऱ्यांचे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.