भारत- दक्षिण आफ्रिका मालिकेत पंचगिरी करणाऱ्या अल्लाउद्दीन पालेकर यांचं थेट रत्नागिरीशी कनेक्शन

रत्नागिरी:- दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांमधील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सोमवारपासून (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरुवात झाली.  या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचे पंच अल्लाउद्दीन पालेकर यांनी कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. मात्र, भारतीय नावाशी साधर्म्य असलेले हे पंच कोण आहेत? हे जाणून घेण्याची सर्व भारतीयांची इच्छा होती.

अस्सल मराठमोळे नाव असलेले हे पंच भारतीय आणि पर्यायाने महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शीव हे त्यांचे मूळ गाव आहे. पालेकर यांचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी केपटाउन, दक्षिण अाफ्रिका येथे झाला. ४४ वर्षीय पालेकर सुमारे अठरा वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली वानखेडे स्टेडियम बघण्यास आले असता त्यांना सुरक्षरक्षकाने आतमध्ये जाण्यास मनाई केली होती. त्याच मैदानावर त्यांनी २०१५ मध्ये झालेल्या मुंबई- मध्य प्रदेश या रणजी सामन्यात पंच म्हणून काम बघितले. सात वर्षांपासून बीसीसीआयच्या अंपायर एक्सचेंज योजने अंतर्गत त्यांना ही संधी मिळाली होती. याच योजनेअंतर्गत त्यांनी न्यूझीलंडमध्ये देखील पंचगिरी केली होती.

कुटुंबातील अनेक सदस्य पंच पालेकर हे पंचांच्या कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील जमालुद्दीन हे देखील एक पंच आहेत. जे अजूनही केपटाऊनमधील शालेय क्रिकेट स्पर्धेत कार्य करतात. त्यांनी ९० च्या दशकात दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या क्लब चॅम्पियनशिपसारख्या स्पर्धांमध्ये देखील भूमिका बजावली आहे. त्यांचे एक काका देखील पंच आहेत. तर त्यांचे २ चुलत भाऊही पंच बनण्याच्या दिशेने काम करत आहेत. स्वतः पालेकर यांनी दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेटदेखील खेळले आहे.

आंतरराष्ट्रीय पदार्पणही भारताविरुद्धच
पालेकर यांनी २०१८ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना, टी२० सामन्यात पंच म्हणून काम पाहताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला अचूकरित्या बाद दिलेले. त्याच वर्षी त्यांना आंतरराष्ट्रीय पंच म्हणून मान्यता मिळालेली. अवघ्या दोन दिवसांपूर्वी ४४ वर्षांचे झाले आहेत. अशा स्थितीत त्यांच्यासाठी हे पदार्पण अधिक खास असेल. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावणारे ते ५७ वे पंच आहेत. त्याचवेळी, अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ४९७ वे पंच ठरले आहेत. पालेकर या कसोटीत त्यांचे मार्गदर्शक मराय इरास्मस यांच्यासोबत काम करत आहेत.