एसटी कर्मचाऱ्यांच्या 5 जानेवारीच्या सूनावणीकडे नजरा; जिल्ह्यात 655 कर्मचारी हजर

रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी विभागात रविवार 2 जानेवारी पर्यंत ६५५ कर्मचारी कामावर हजर होते. परंतु चालक, वाहकांची संख्या अजूनही वाढत नसल्यामुळे एसटीची सेवा विस्कळितच आहे. या चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता ५ जानेवारीला होणाऱ्या न्यायालयातील सुनावणीवेळी कोणता निर्णय होतो की पुढील तारीख मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एसटी विभागात आज प्रशासकीय २७३, कार्यशाळा १९२, चालक ७५, वाहक ७२, चालक तथा वाहक ४३ असे ६५५ कर्मचारी हजर होते. अधिकृत रजेवरील कर्मचाऱ्यांची संख्या ६७ होती. अजूनही प्रत्यक्ष बंदमध्ये २९५७ कर्मचारी सहभागी आहेत. यामध्ये चालक ७५०, वाहक ५६८, चालक तथा वाहक ११०६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जोपर्यंत चालक, वाहक आणि चालक तथा वाहक हजर होत नाहीत, तोपर्यंत एसटी सेवा सुरळित होण्याची शक्यता नाही.
दरम्यान, रत्नागिरीमध्ये कर्मचारी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. माळनाका येथील विभागीय कार्यालयाबाहेर दिवसभर उपस्थित राहून हे कर्मचारी आपापल्या घरी जातात. दिवसभरात येथे कर्मचाऱ्यांना दुपारच्या जेवणाची सुविधा दिली जात आहे.
जिल्ह्यात सर्व आगारांमध्ये थोड्या प्रमाणात वाहतूक चालू झाली असली तरी रत्नागिरी आणि गुहागर आगारातून फारशी वाहतूक चालू झालेली नाही. तसेच रत्नागिरीतील शहरी बसस्थानकातून एकही फेरी सोडण्यात आलेली नाही. यातील एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. त्यामुळे शहर परिसर आणि १५ किमी अंतरावरून शहरी फेऱ्यांतून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यातील बहुतांशी लोक हे स्थानिक व्यापारी, कार्यालयांत कामाला आहेत. परंतु दोन महिने ते कामावर येऊ शकलेले नाहीत. काहींनी पर्यायी व्यवस्था केली आहे. परंतु वाढता महागाई खर्च आणि पेट्रोल खर्च न परवडणारा असल्याने गावातच रोजगार शोधण्याची वेळ बऱ्याच जणांवर आली आहे.