तत्कालीन शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरत युनियन बँक ऑफ इंडियाला 5 कोटी 12 लाखांचा चुना; रत्नागिरीतील 23 जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरत खोटी कागदपत्रे सादर करून युनियन बँक ऑफ इंडीयाला 5 कोटी 12 लाख 98 हजार रुपयांना फसवणाऱ्या कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह  23 जणांवर रत्नागिरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

विरेश चंद्रशेखर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन शाखाध्यक्ष यांच्यासह 23 जणांवर भा. दं. वि. क. 406, 409, 420, 465, 468, 471, 472,119, 200, 193, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी चंद्रशेखर यांना युनियन बँकेकडुन झाल्या आदेशा प्रमाणे सन 2015-2016 या सालात 20 कर्जदार यांनी अर्ज घेण्यासाठी सादर केलेली संबधित कागदपत्रे ( 7/12 उतारा व अन्य कागदपत्रे तसेच खोटे व बनावट भाडे करारपत्र / वट मुखत्यारपत्र ) कर्ज मागणी अर्ज व त्या संबंधित कागदपत्रे तसेच कर्ज मंजूर केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती असलेल्या एकुण 20 कर्जदार यांनी तसेच सदर कर्ज मंजुरी करीता मध्यस्ती म्हणुन दोघांनी आपसात संगनमत करुन युनियन बँक ऑफ इंडीया या बॅकेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बँकेकडुन आंबा पिकपाणीसाठी कर्ज मंजुरी करीता संशयास्पद कगदपत्रे तयार करुन ती खरी आहेत असे भासवून त्याद्वारे कर्ज मंजूर करुन घेवुन त्या मंजुर रक्कमेचा आंबा पिकपाणीकरीता वापर न करता, वैयक्तीक खर्चासाठी वापर करुन सदर रक्कमेची परत फेड केलेली नाही. तसेच कर्जदार हे घेतलेले कर्ज फेड करु शकतात अगर कसे याबाबत कोणतीही शहानिशा न करता तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता शाखा व्यवस्थापक एस. प्रशांत यांनी बँकेकडुन कर्ज मंजुर करुन देवुन आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. म्हणुन बँकेची 5,12,98,000/- रु . एवढ्या रक्केची फसवणुक केली. या संदर्भात शाखा व्यवस्थापक एस. प्रशांत यांची बॅकेकडुन चौकशी झाली त्यामध्ये ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेने तक्रार केली आणि आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.