नऊ महिन्यात साडेतीन कोटींचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन विभागाने एप्रिल 2021 ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत केलेल्या कारवाईतून सुमारे 3 कोटी 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करताना या विभागाने केलेल्या कारवाईत 583 संशयितांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यांमधील सर्व प्रकारची मिळून 13 वाहनेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली.

गोव्यातून होणार्‍या बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची 2 पथके रत्नागिरी-सिंधुदुर्गसीमेवर कायम तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच एक पथक चिपळूण, लांजासह सर्व जिल्ह्यात ठिक-ठिकाणी नेहमी गस्त घालत असते. रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर  धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारु वाहतूक व विक्रीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पुरेसे मुनष्य बळ नसतानाही या पथकाने भरीव अशी कामगिरी केली आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने एका कर्मचार्‍यावर दोन तालुक्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कारवाईतील संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने या सर्व गडबडीत सबळ पुराव्यांअभावी आरोपींची सुटका होते. रत्नागिरी जिल्ह्यात 9 वाईन शॉप, 210 परमिट रुम, 58 देशी दारु दुकानने आणि 132 बिअर शॉपी आहेत. यातील 50 दुकानांच्या  परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येऊनही कोरोना काळातील मंदी,भागीदारीचे वाद यामुळे ते सध्या बंद आहेत.

दारुचे सेवन करण्यासाठी 25 वर्षांची वयोमर्यादा असून दारु विक्रीच्या दुकानांमध्ये देशी दारुसाठी 3 रुपये आणि विदेशी दारुसाठी 5 रुपये दराने परवाना उपलब्ध होतो. तसेच ऑनलाईन प्रणालीव्दारे वर्षभर दारुचे सेवन करण्यासाठी 100 रुपये आणि आजीवन दारुचे सेवन करण्यासाठी 1 हजार रुपये भरुन परवाने दिले जातात. रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन विभागाने आतापर्यंत 90 हजार परवाने दारुविक्रीच्या दुकानांमध्ये दिले आहेत.