रनप सत्ताधाऱ्यांचा कालावधी संपुष्टात; पदाधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेवर अखेर आज प्रशासक म्हणून मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी नियुक्ती झाली. त्यामुळे पालिकेतील लोकप्रतिनिधींची वर्दळ बंद झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची केबिन बंद करण्यात आली आहेत. पंचवार्षिक निवडणुका कोरोना महामारी संसर्गामुळे लांबल्या आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाने प्रशासकीय नियुक्तीचे आदेश काढले आहेत. पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात गेला आहे.  

रत्नागिरी पालिकेवरील शिवसेनेच्या सत्तेचा कालावधी काल संपुष्टात आला. काल (ता.27) अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह अनेक सदस्यांनी पालिकेत येऊन आपापल्या कामांचा पाठपुरावा केला. अनेकांना मुदत संपणार असल्याची माहिती नव्हती. अखेर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आठवण करून दिल्यानंतर नगराध्यक्ष, सभापती, सदस्य पालिकेत दाखल झाले. नगरविकास विभागाने तत्काळ प्रशासक नियुक्तीचे पत्र पालिकांना दिले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी तुषार बाबर यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानंतर तत्काळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची दालने बंद केली. त्यामुळे आज दुपारपर्यंत एकही लोकप्रतिनिधी पालिकेकडे फिरकला नव्हता. पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हातात गेला आहे.

कोरोनाचे संकट कायम असल्याने संसर्गाच्या विचार करून निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्याला काही महिने अवधी असल्याने किमान दोन ते तीन महिने पालिकेवर प्रशासक राहण्याची शक्यता आहे.