निवडणूक काळात पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये; 140 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, 56 ठिकाणी छापेमारी 

रत्नागिरी:- दोन नगरपंचायती आणि ग्रामपंचायत पोटनिवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा पोलिसांनी उत्तम नियोजन केले होते. या कालावधीत १४० प्रतिबंधात्मक कारवाया पोलिसांनी केल्या. दारू, जुगारावरील ५६ ठिकाणी मारलेल्या छाप्यात सत्तर जणांना अटक केली आणि साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

दापोलीत २८ आणि मंडणगडमध्ये १३ मतदान केंद्रावरील पोटनिवडणूक शांततेत झाली. दोन्ही नगरपंचायतींमध्ये ६ मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देणे आवश्यक होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरीता जिल्हा पोलीस दलाने निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून पूर्वतयारी केली होती. समाजविघातक कृत्य करणारे आणि जातीय, राजकीय गुंड यांच्यावर आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने १४० प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या. अवैध दारु प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ४१ ठिकाणी छापे मारुन ४२ संशयितांकडून २ लाख ६६ हजार ३४५ रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार कायदातंर्गत १५ प्रकरणात २८ संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून ६३ हजार ७९९ रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ५५ अन्वये एका टोळीला रत्नागिरी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.

निवडणुकीत मतदारांना फुस लावणे, मोह दाखविणे, प्रलोभने दाखविणे, धाक दाखविणे, दारुचा वापर करणे तसेच मोठयाप्रमाणात मतदारांना पैशाचे वाटप असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात वेळोवेळी नाकाबंदी करण्यात आली. तसेच नॉक आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदयातंर्गत ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ संशयितांकडून ५ हजार १९० रुपयांचा, तर जुगार कायद्यांतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ संशयितांकडून ११ हजार ७६२ रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. ग्रामपंचायत क्षेत्रात शांतता राखण्यासाठी ग्रामबैठका घेण्यात आल्या.