आंबा कलमांवर मोहोर येण्यासाठी अनुकूल स्थिती; बागायतदारांच्या आशा पल्लवित

रत्नागिरी:- जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत असून, पुढील काही दिवस थंडीचे वातावरण कायम राहणार आहे. यामुळे पुढील काही दिवसात आंबा कलमे मोहरतील अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावर्षी  पावसाळा लांबल्याने जमिनीतील ओलावा कायम राहिला. नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत होता. यंदा ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. त्यामुळे आंबा कलमांच्या मुळांवर ताण येऊन मोहर येण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी सुरू झाली. परंतु, सातत्याने हवामानातील बदल कायम राहिला, उष्मा, ढगाळ हवामान, मध्येच पावसाची हजेरी या विचित्र हवामानामुळे पालवीवर तुडतुडा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. बागायतदारांनी कीटनाशकांची फवारणी करून तुडतुडा, बुरशीवर  नियंत्रण मिळविले.

गेले चार दिवस थंडीचे प्रमाण वाढले आहे. अजून किमान आठवडाभर अशीच थंडी राहणार आहे. सुरूवातीच्या थंडीमुळे पाच टक्के मोहोर काही झाडांना आला होता. त्याठिकाणी फळधारणा सुरू झाली आहे. मात्र, थंडीमुळे मोहोर आलेल्या झाडांना पुनर्मोहाराचा धोका आहे. पुनर्मोहोर सुरू झाला तर मात्र झालेली फळधारणा टिकणार नाही.
शिवाय रात्रीचे तापामान कमी व दिवसाचे तापमान उच्चत्तम राहिले तर मात्र थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचे हवामान मात्र मोहोरासाठी पोषक आहे. शिवाय कीडरोगाचाही प्रादूर्भाव न होणारे आहे. जानेवारीमध्ये कडाक्याची थंडीं पडते. कडाक्याच्या थंडीमुळे फुलोरा वाढू शकतो. मात्र, त्यामुळे निव्वळ फुलोरा होऊन फळधारणा अत्यल्प होते. शिवाय पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू राहिल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
गतवर्षीदेखील थ्रीप्स व तुडतुड्यामुळे बागायतदार हैराण झाले होते. या वर्षी नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन आठवड्याच्या फरकाने हवामानाचा अंदाज घेत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, त्यामुळे खर्च वाढतो. सध्या बागायतदारांनी पालवीचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे.