कोरोना लसीकरणाकरीता सक्तीची मोहीम स्थगित करा; बिएमपीकडून धरणे आंदोलन

रत्नागिरी:- कोरोनावरील लस घेण्यासाठी सक्तीची राबवलेली मोहीम तत्काळ स्थगित करावी या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

विविध मागण्यांचे निवेदन बाळा कचरे यांच्यासह उपस्थित सदस्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. संपूर्ण देशात कोरोना लसीची सक्ती शासकीय-निमशासकीय  खाजगी सरकारी उद्योग, कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, शिक्षण-शिक्षकेतर कर्मचारी, रेल्वे प्रवास, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, दुकानदार यांना लस घेणे सक्तीचे केले जात आहे. लस न घेतल्यास व्यावसाय करण्यावर बंधने घालण्यात येत आहेत. लस घेणे पूर्णपणे ऐच्छिक असून लस न घेतल्यास रेल्वे प्रवास दुकानातील खरेदी, एस टी प्रवास तसेच डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस मिळणार नसल्याचे निर्देश शासनाकडून निर्गमीत केले जात आहेत. शासन आणि प्रशासन कलम 14, 19 ब कलम, 21 चे उल्लंघन करत आहे. जनतेच्या संविधानीक अधिकाराची पायमल्ली करत आहे. देश लोकशाही प्रधान आहे की हुकुमशाही प्रधान आहे का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही बंधने घालू नयेत असे आवाहन बहूजन मुक्ती पार्टीतर्फे करण्यात आले आहे.