जिल्ह्यात एसटीचे 600 कर्मचारी हजर; आज होणाऱ्या सुनावणीकडे नजरा 

रत्नागिरी:- जिल्ह्यात एसटी काम बंद आंदोलनाच्या ४० व्या दिवशी ३ हजार ५० कर्मचारी अजूनही बंद आंदोलनात सहभागी आहेत तसेच ६०० कर्मचारी कामावर हजर होते तर ८९ जण अधिकृत रजेवर होते. आता सर्वांच्या नजरा सोमवारकडे लागल्या आहेत. आज २० डिसेंबरला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतर आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे. बहुतांशी कर्मचारी या निर्णयानंतर कामावर हजर होणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या ८ नोव्हेंबरला काम बंद आंदोलन सुरू झाले. कोणत्याही स्थितीत विलिनीकरण झाल्याशिवाय कामावर हजर होणार नाही, या मुद्द्यावर कर्मचारी ठाम राहिले आहेत. परंतु शासनाने ४१ टक्के वेतनवाढ दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली. सुरवातीला खूपच कमी फेऱ्या व फारसे प्रवासी नव्हते. परंतु गेल्या १० दिवसांत दिवसाला १६ ते १७ हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करू लागले आहेत. हजर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियोजनातून वाहतूक सुरू आहे. आतापर्यंत साडेसहाशे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये निलंबन, सेवासमाप्ती अशा प्रकारच्या कारवाईचा समावेश आहे.

एसटी विभागात आज प्रशासकीय २५५, कार्यशाळा १८०, चालक ७१, वाहक ६२ आणि चालक तथा वाहक ३२ जण कामावर हजर होते. कर्मचाऱ्यांचा बंद बेकायदेशीर आहे आणि आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. आज २० डिसेंबरनंतर त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.