दिवसभरात एसटीच्या ६० पेक्षा अधिक गाड्या रस्त्यावर; १६ हजार प्रवाशांना फायदा

रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी विभागातील काम बंद आंदोलन जोमात असले तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिकार्‍यांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ३ हजार ७७९ पैकी ६०७ कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे दिवसभरात साठहून अधिक गाड्या धावू लागल्या असून १६ हजाराहून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला.

जिल्ह्यात सर्वाधिक दापोली, खेड, चिपळूण, देवरुख या बसस्थानकातून वाहतुकीचे जास्त प्रमाण आहे. येथील काही कर्मचारी बंदमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत येऊ लागले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १७) ६०७ कर्मचारी हजर होते. त्यामध्ये प्रशासकीय २५६, कार्यशाळा १८२, चालक ७४, वाहक ६२, चालक तथा वाहक ३३ यांचा समावेश होता. ८२ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. कर्मचारी हळुहळू कामावर हजर होत असल्याचा दावा रत्नागिरी एसटी विभागाने केला आहे. विभागातील ३७७९ पैकी ३ हजार ९० कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. दिवसभरात साठ गाड्यांनी ११ हजार ७४० किलोमीटरचा प्रवास केला. वाहतूक चालु झाल्यामुळे १५ हजार ९५५ प्रवाशांना लाभ मिळाला. यामधून दिवसभरात ३ लाख ८६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

दरम्यान, रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब हे आंदोलकांशी चर्चा करतील अशी आशा होती; परंतु परब यांनी आंदोलकांची दखलही घेतली नाही. तसेच एसटी सुरळीत व्हावी यासाठी आंदोलनातून माघार घेण्याचे आवाहन मंत्री परब यांनी केले आहे.