‘ई-पीक पाहणी’ साठी 93 हजार 796 शेतकऱ्यांकडून अ‍ॅपवर नोंदणी

रत्नागिरी:- ‘ई-पीक पाहणी’ अ‍ॅपद्वारे करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 93 हजार 796 शेतकर्‍यांनी अ‍ॅपवर नोंद केली आहे. सध्या रब्बी पिकं घेणर्‍यांची नोंद सुरु आहे. अ‍ँड्रॉईड मोबाईलसह नेटवर्कच्या अडचणीमुळे अनेक गावांमध्ये शेताच्या बांधावर जाऊन पीकपेरा नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यावर मात करुन कार्यवाही करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत.

पीककर्ज, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीत पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी शेतीच्या स्वरूपाची झालेली सविस्तर नोंद प्रशासनाला सोयीची ठरु शकते यासाठी ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पीक पेराची नोंदणी उपक्रम शासनाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये शेतकर्‍यांना पिकांची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. सातबारा उतार्‍यावर दरवर्षी सप्टेंबरअखेर शेतकर्‍यांनी पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी तलाठी व मंडल अधिकार्‍यांमार्फत होते. यंदा शासनाने शेतकर्‍यांनी स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती अ‍ॅपद्वारे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोनवरून स्वतः भरण्यास सुरवात केली आहे. यामध्ये शेत जमिनीचा गट व खाते नंबर, पिकाची माहिती, हंगामनिहाय माहिती, पिकांचे छायाचित्र आदींची माहिती भरावयाची आहे. या मोहीमेच्या आरंभीपासून गावोगावी नसलेली मोबाईल रेंज आणि सुरळीत इंटरनेट नसल्याने अडचणी येत होत्या. अनेक शेतकर्‍यांकडे अ‍ॅड्राईड मोबाईलच नसल्याने त्यावर माहिती भरणेच शक्य नव्हते. याही परिस्थितीत अनेक कर्मचार्‍यांनी गावातील तरुणांची मदत घेतली. एका मोबाईलवरुन वीस जणांच्या नोंदणी शक्य आहेत. त्या तरुणांच्या मदतीने शेतकर्‍यांच्या नोंदी घालून दिल्या जात आहेत. मात्र जिथे रेंजच नाहीत, तिथे अडचणी आहेत. जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक खातेदार असून त्यातील 93 हजार 796 शेतकर्‍यांनी अ‍ॅपवर नोंद केली. पहिल्या टप्प्यात एकुण खातेदारांपैकी दहा टक्केहून अधिक खातेदारांची नोंद करुन घ्यावयाची आहे. ते लक्ष्य पूर्ण झाले आहे. उर्वरित नोंदीही करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.