पालकांवर फी वाढीचा बोजा; पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कात वाढ 

रत्नागिरी:- इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना देता येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वाढवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांवर फी वाढीचा बोजा पडणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) 20 फेब—ुवारी 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी सांगितले आहे. शासनमान्य शाळांमधून  2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत आणि आठवीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत.

आजकाल स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत पालकांच्यामध्ये वाढलेली जागरुकता पाहता जास्तीत जास्त पालक आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षांना बसवण्याचा आग्रह धरतात. राज्य शासनाने चालवलेल्या व परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केल्या जात असलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला मोठे महत्त्व आहे.

या परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीपर्यंत शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या परीक्षेचा मोठा आधार आहे. परंतु परीक्षा परिषदेने या परीक्षेचे शुल्क मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 20 रुपयांवरून 125 रुपये तर बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 80 रुपयांवरून 200 रुपये इतके वाढवले आहे.

याचा फटका ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बसणार आहे. परीक्षांचे महत्त्व विचारात घेऊन शासनाने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफक ठेवावे, अशी रास्त अपेक्षा ग्रामीण भागातील पालक व्यक्त करीत आहेत.गेले दोन वर्ष कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या, त्यामुळे पालकांपुढे विद्यार्थ्यांच्या एकाबाजूने भवितव्याबाबत चिंता होतीच. आता शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांपुढे आता शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क वाढल्याने नवीन संकट उभे राहिले आहे. एकूणच सद्यस्थितीचा विचार करता शासनाने परीक्षा शुल्क माफक ठेवावे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील पालकांची आहे. दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळत नाही, हाही अनुभव विद्यार्थ्यांसह पालकांनी यापूर्वी अनेक वेळा घेतलेला आहे.