धोकादायक आंबा घाटात तीन ठिकाणी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत

रत्नागिरी:- जुलै महिन्यात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणार्‍या आंबा घाटात दरडी कोसळून रस्ता खचला होता. धोकादायक अशा तीन ठिकाणी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागेल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

अतिमुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला जबरदस्त तडाखा बसला. सह्याद्रीच्या खोर्‍यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे यासारखे प्रकार घडले. आंबा घाटातील परिस्थिती अत्यंत गंभीर होतील. डोंगरातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर दगड-माती रस्त्यावर वाहून आली. बारा ठिकाणी असे प्रकार घडले. त्यातील तिन ठिकाणी खोल दरीच्या बाजूने अर्धा रस्ता खचला होता. त्यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. दगड-माती बाजूला केल्यानंतर दुचाकी, चारचाकीसाठी मार्ग खुला करण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर डोंगराच्या बाजूने सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधून वीस टनी वजनाच्या गाड्या घाटातून सोडण्यास सुरवात झाली. कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे याची डागडुजी लवकरात लवकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळे पावले उचलण्यात येत आहे. सध्या आंबा घाटात दरीच्या बाजूने कोसळलेल्या भाग दुरुस्त केला जात आहे.
भविष्यात पावसाळ्यामध्ये पुन्हा धोका निर्माण होऊ नये यासाठी तळातील भागात गॅबिअन प्रकारचा बंधारा टाकला जाईल. त्यावर सिमेंट काँक्रिटची भिंती बांधण्यात येणार आहे. यासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम सुरु करुन एक महिना पूर्ण झाला आहे. या कामासाठी भली मोठी क्रेन आणली गेली आहे. काँक्रिट टाकण्याचे काम रात्रीच्यावेळी केले जाते. संरक्षक भिंतीसह त्या भागातील दुपदरी रस्ता बांधण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मालवाहू ट्रेलरसह अति अवजड वाहतूकीला प्रतिक्षाच करावी लागणार आहे. काम सुरु असलेल्या भागात एकमार्गी वाहतूक केली जाते. पुढील पावसाळ्यात या येथील रस्ता मजबूत करण्याच्यादृष्टीने सध्या काम सुरु असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरुन जयगड बंदराकडे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात साखर आणली जाते. आंबा घाट बंद असल्याने ही वाहतुक अन्य मार्गाने केली जात असल्यामुळे संबंधित कारखानदारांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी कोल्हापूरमधील साखर व्यावसायिकांकडून केली जात आहे.