राजापूर:-राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे सागरी महामार्गावर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाला तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या मुलींची नावे आराध्या अनिल राठोड (वय ५), तुलसीकुमारी शिकारी (वय १२, दोघीही मूळ राहणार विजापूर) अशी आहेत. याच अपघातात अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाही.
सागरी महामार्गावरून जैतापूरकडून देवगडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने बाकाळे येथील तीव्र वळणावर तीन ते चार जणांना ठोकरले. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये बारा वर्षीय तुलसीकुमारीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच वर्षीय आराध्या राठोडचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अन्य दोन महिला या अपघातात गंभीर झाल्याचे नाटे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली असून टेम्पोने ठोकरल्यानंतर काही अंतरावर टेम्पो सोडून चालक पसार झाला होता. युगंधर घाडी (रा.देवगड) असे टेम्पो चालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
बाकाळे येथे रस्त्याच्या कामावर आलेल्या मजुरांपैकी ही मृत मुले असल्याचे समजते. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ सागरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील करीत आहेत.