गुहागर:- रत्नागिरी गॅस अँड पॉवर या दाभोळ ऊर्जा प्रकल्पात उभ्या असलेल्या प्रकल्पाच्या इमारतीचा इमारत कर मिळावा, यासाठी अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन प्रकल्पग्रस्त गावांनी प्रकल्पसमोर सुरू केलेल्या आंदोलनामुळे या तीन ही गावांमधील लोकांवर गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेली अनेक वर्षे या ऊर्जा प्रकल्पाच्या हद्दीतील तीन गावातील ग्रामपंचायतींना प्रकल्प कंपनीकडून करोडो रुपयांचा कर इमारत बांधकाम कर म्हणून मिळत आहे. मात्र, या वर्षापासून कंपनीने हा कर भरण्यास नकार दिला. कंपनीच्या म्हणण्यानुसार सदर ऊर्जा प्रकल हा भारत सरकारच्या मालकीचा झाला असून त्याला कर भरणे बंधनकारक नाही. मात्र, प्रकल्पग्रस्त गावांनी कंपनीचे हे म्हणणे नाकबूल करत आपल्या हद्दीतील बांधकामांचा कर हा कायदेशीर पणे आम्हाला मिळायलाच पाहिजे, अशी भूमिका घेत कंपनीकडे पत्र व्यवहार सुरू ठेवला. कंपनी या विषयी चर्चा करायलाही तयार नाही म्हणून या तीन गावांतील लोकांनी प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने कंपनीला २० ऑक्टोबर २०२१ ला पत्र देऊन आमच्या कायदेशीर हक्कासाठी कंपनीसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
रानवी, वेलदूर व अंजनवेल गावातील लोकांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले. हे आंदोलन १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले. त्या नंतर सुमारे ११ दिवसानंतर या प्रकल्पाचे प्रमुख अमित ओम प्रकाश शर्मा यांनी गुहागर पोलिसात फिर्याद दाखल केली व त्या वरून गुहागर पोलिसांनी आत्माराम मोरे ( माजी सरपंच अंजनवेल ) विठ्ठल भालेकर ( माजी सरपंच वेलदूर ) राजू धामणस्कर ( अंजनवेल ) यशवंत बा ईत ( सरपंच , अंजनवेल ) व संदीप कदम ( रानवी ) या पाचजणांसह समर्थक ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे .