वाहन चालकांनो सावधान! वाहन चालकांकडे हेल्मेट नसल्यास थेट लायसन्स रद्द

रत्नागिरी:-वाहन चालकांकडे आता हेल्मेट नसल्यास लायसन्सच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेत केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजाणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्राच्या सुधारित मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हात विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हेल्मेट न घातल्यास वाहन चालवणाऱ्याचे लायसन्सच देखील रद्द होणार आहे. राज्यात, जिल्हात सध्या अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होत असल्याचे अनेक अपघातात दिसून आले आहे. याची दखल घेत राज्याने सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार आता हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायसन्स देखील रद्द केले जाणार आहे. या व्यतिरिक्त विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचे देखील लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. वाहन क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याचबरोबर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास दुचाकींसाठी एक हजार रुपये, ट्रॅक्टरसाठी दीड हजार रुपये, हलक्या वाहनांसाठी दोन हजार आणि इतर सर्व वाहनांसाठी चार हजार रुपये दंड लागू करण्यात आला आहे. याबाबत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला कळविले आहे.

वर्षात दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे. अशाच प्रकारचा दंड मोबाईलवर बोलताना वाहन चालवल्यासही होणार आहे. परावर्तक (रिफ्लेक्टर) नसणे, फॅन्सी नंबरप्लेट बसवणे याना यापूर्वी २०० रुपये दंड होता. तो १ हजार रुपये करण्यात आला आहे.

वाहनधारकांकडून जादा रक्कम वसूल करून त्यांना त्रास देणे हा त्यामागील उद्देश नाही तर दंडाच्या रकमेच्या भितीपोटी मोटारवाहन कायद्याचे पालन केले जाईल, हाच याचा मुख्य उद्देश आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे.

सुबोध मेडसीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी