नावेद-2 अपघात प्रकरण; फतेहगड मालवाहू नौकेवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छिमार नौकेचे अवशेष मिळाल्यानंतर नौकामालक यांनी फतेहगड या मालवाहू नौकेने नावेद-2 ला धडक देत अपघात केल्याची तक्रार जयगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्या तक्रारीनंतर फतेहगड नौकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

26 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी गेलेली नावेद -2 नौका अचानक ग़ायब झाली. या नौकेला मालवाहू जहाजाने धडक दिल्याचा अंदाज मच्छिमारांनी व्यक्त केला होता. या नौकेवर सहा खलाशी होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला होता.उर्वरित पाच बेपत्ता आहेत. शोधमोहिम राबवूनही नौकेचा शोध लागत नव्हता. त्यामुळे स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले होते. मच्छिमारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

40 दिवस बुडालेल्या नौकेचा शोध पोलीस घेत होते. शनिवारी सकाळी स्थानिक मच्छिमारांना नावेद-2 मच्छिमार नौकेचा ॲंकर,बोया,दोरी आणि फाटलेले जाळे सापडले. हे अवशेष नावेद-2 या मच्छिमार नौकेचे असल्याचे नौकामालक नासीर संसारे यांनी ओळखले.त्यानंतर नासीर संसारे यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला.

दरम्यान फतेहगडने नौकेने हलगर्जीपणा केल्यामुळेच नौकेवरील खलाशांच्या मृत्यूला ते जबाबदार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आता आम्ही चौकशी करून लवकरच चार्जशीट दाखल करू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.गर्ग यांनी सांगितले.