शासन निर्णयाचे पालन करा अन्यथा दुर्घटना घडल्यास नौका मालक जबाबदार

जिल्हा प्रशासनाच्या कडक सूचना

रत्नागिरी:- सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आणि जिवीतहानी टाळण्याकरीता सर्व मच्छिमारांनी शासनाच्या निकषांचे पालन करुन मासेमारी करणे आवश्यक आहे. अन्यथा याबाबत भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला नौका मालकांना जबाबदार ठरविण्यात येईल, अशा कडक सुचना जिल्हा प्रशासनाकडून मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत.

सहाय्यक मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना पत्रक काढून कोणत्या निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे, याची माहिती देण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि सागरी सुरक्षा यंत्रणेमार्फत मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते. त्या मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौकामालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ ओळखपत्र, नौकेची नोंदणी प्रमाणपत्र, मूळ मासेमारी परवाना, विमाच्या प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची मालकानुसार जीवन रक्षक साधने, अग्निशामन साधने नसल्याचे आढळून येत आहे. ही सागरी सुरक्षेच्या दृष्टीने व मच्छिमारांच्या जिवीतहानी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याकरीता मासेमारीसाठी समुद्रात नौका जात असताना नौकांवर असलेले नौकामालक, तांडेल व खलाशाचे मूळ ओळखपत्र ठेवण्यात यावे. नोंदणी प्रमाणपत्रानुसार नौकेवर जास्त तांडेल व खलाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षेयंत्रणेमाफत अतिरिक्त खलाशांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

मच्छिमारांनी नौकेवर जीवरक्षक साधनांसमवेत यांत्रिक नौकांवर व्हीटीएस (व्हेसल्स ट्रॅकिंग सिस्टीम), एआयएस (ऑटोमॅटीक आयडेन्टीफिकेशन सिस्टीम), डीएटी (डीस्ट्रीक्ट अलर्ट ट्रान्समीटर) यंत्रप्रणाली बसविणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या होत असलेल्या मासेमारीस आळा घालणे तसेच शाश्वत मासेमारी टिकून ठेवणे व सागरी सुरक्षेच्या हेतू लक्षात घेता प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा. नौका मालकाने नौकेच्या इतर कागदपत्रासह नौकेचा व नौकेवरील खलाशी यांचा यथायोग्य विमा काढण्यात यावा तसेच सदरील नौका समुद्रामध्ये मासेमारी करण्यास योग्य असल्याबाबत नौकेचे प्रमाणपत्र मासेमारी करताना संबंधित नौकेवर असणे बंधनकारक आहे. समुद्रामध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त नौका व त्यावरील खलाशी यांना नुकसानभरपाई मिळणे सहज शक्य होईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 84 मासळी उतरविण्याची केंद्रे असून त्यामधील 46 बंदरे अधिसूचित बंदरे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मात्र उर्वरित मासळी उतरविण्याच्या केंद्रावर पर्यायी व्यवस्था म्हणून काही प्रमाणात मासळी उतरविली जाते. 46 मासळी उतरविण्याच्या केंद्रापैकी 21 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती ही राज्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर व मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यांसाठी मच्छिमार नौकांचा वापर केल्यामुळे मासेमारी नौकांचे अवागमन व त्यावरील खलाशांची माहिती घेणे, नौकांची नोंदणी करणे व या सर्वांसाठी टोकन पध्दत राबविण्याकरीता सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकामार्फत प्रत्येक मासेमारी नौका प्रत्येक वेळी मासेमारीस समुद्रात जाताना विधीग्राह्य कागदपत्रांची खलाश्यांची तसेच नौका हालचाल नोंदवहीतील बाबनिहाय नोंद घेवून नौकेस टोकन देण्यात येईल. नौका मासेमारी करुन मासळी उतरविण्याच्या केंद्रावर परत आल्यानंतर टोकन जमा करताना पुन्हा सर्व नोंदी सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत तपासण्यात येतील व त्याची नोंद हालचाल नोंदवहीत घेतील. या बाबींची दक्षता सुरक्षा रक्षकांबरोबरच मच्छिमारांनी घेणे आवश्यक आहे. मासेमारी बंदी कालावधीमध्ये कोणतीही यांत्रिकी नौका मासेमारीस जाणार नाही याबाबत देखील सर्व मच्छिमारांनी दक्षता घ्यावी व सुरक्षा रक्षकांनी नौका बंदी कालावधीत मासेमारीस जाण्यास प्रतिबंध करतील. आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या संदेश मच्छिमारांना सुरक्षा रक्षक पोहोचवतील.