जयगडहून गोव्याला निघालेले कृष्णा बार्ज बुडाले; १ मृतदेह आढळला, ४ बेपत्ता

रत्नागिरी:- जयगड वरून गोव्याला निघालेले कृष्णा बार्ज समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना २ डिसेंबरची असून जवाद चक्रीवादळामुळे झालेल्या खराब हवामानाचा फटका या बार्जला बसला. कृष्णा बार्ज बुडाले तेव्हा त्यावर १० क्रू मेंबर होते. बार्ज बुडत असल्याने १० जणांनी समुद्रात उडी मारली. त्यातील ५ जणांना वाचवण्यात गोवा तटरक्षक दलाला यश आलं. तर, एकाचा मृतदेह मिळाला. अद्याप चार सदस्य बेपत्ता होते अशी माहिती मिळत आहे.

जयगड येथून गोव्यासाठी हे बार्ज निघाले होते. २ डिसेबर रोजी समुद्रातील खराब हवामान वादळी स्थितीचा फटका बसला. हे बार्ज वेंगुर्ला रॉक्सच्या परिसरात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंचर गोवा तटरक्षक दलाने त्यांचे हेलिकॉप्टर चेतक आणि तीन जहाजे शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवली. यावेळी केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी तिघांना वाचवलं होतं. सध्या गोवा तटरक्षक दल समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहे.गोवा तटरक्षक दलाने चेतक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलेल्या ५ सदस्यांना गोवा बांबुळी मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अजूनही ४ सदस्य बेपत्ता असून त्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.