सागरी सुरक्षा कवच; भगवती बंदर येथून सात बनावट दहशतवादी ताब्यात

 रत्नागिरी:- सागरी सुरक्षा अधिक भक्कम व्हावी, या उद्देशाने किनारपट्टीवर दोन दिवसाचे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात आले. यामध्ये जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी बनावट घुसखोरांना सुरक्षा यंत्रणांनी किनाऱ्यावरच ताब्यात घेतले. रत्नागिरी पोलिसांनी भगवती बंदरामध्ये ७ बनावट दहशतवाद्याना ताब्यात घेतले.

सागरी किनारा किती सुरक्षित आहे, हे पडताळून पाहण्यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान दोन दिवसांसाठी जिल्ह्यातील विविध समुद्राच्या ठिकाणी राबवण्यात आले.या अभियानात पोलिस दल, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, सीमा शुल्क, सागरी सुरक्षा दल आदी सर्व विभाग सहभागी झाले होते. हे अभियान बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस राबविणयात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश किनाऱ्यावरील सुरक्षा हा आहे . कोकणात अनोळखी व्यक्ती बोट घेऊन समुद्रामार्गे दाखल झाल्या तर सर्व यंत्रणा किती सतर्क आहेत, हे या मोहिमेत पडताळण्यात आले. जिल्ह्यातील सर्व जेटींवरील पोलिस चौक्या तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत, याची या अभियानात चाचपणी घेण्यात आली.