अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील हापूसचे मोठे नुकसान 

रत्नागिरी:- मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यात हापूसच्या कलमांना आलेली कणी गळून गेली आहे. त्याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. पावसाचा काही दिवस कायम राहिला तर शिल्लक मोहोर आणि कणी पडून जाईल. तसेच जमिनीत पाणी मुरल्यामुळे मोहोर येण्यायोग्य झाडांना पुन्हा पालवी येईल. त्यामुळे बागायतदार अडचणीत येणार आहे, अशी भिती देवेंद्र झापडेकर यांनी व्यक्त केल आहे.

गेले दोन दिवस अवकाळी पाऊस झाला आहे. याबाबत बागायतदार श्री. झापडेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, नोव्हेंबर, डिसेंबर या कालवधीत थंडी पडणे अपेक्षित होते. मोहोरामधून कैरी येण्याची स्थिती असतानाच पावसाने गोंधळ घातला आहे. जोरात पडलेल्या पावसामुळे मोहोराला आलेली बारीक कणी पडून वाया गेली आहे. उरलेली कणीही पडून जाण्याची भिती आहे. ढगाळ वातावरणामुळे किडरोगांसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढेल. या परिस्थितीमधून कणीला वाचवायचे असेल तर फवारणी हा एकमेवर पर्याय आहे. परंतु हवामान विभागाकडून 3 डिसेंबरपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तविल्यामुळे बागायतदारांना फवारणी करणे अडचणीचे वाटत आहे. औषध झाडावर मारल्यानंतर त्यावर पाऊस पडला तर ते धुपून जाण्याची शक्यता आहे. पण कणी वाचवण्यासाठी फवारणी आवश्यक असल्याने बागायतदार दुहेरी संकटात सापडले आहेत. ही परिस्थिती बागायतदारांना नुकसानीत ढकलणारी आहे.

ते म्हणाले, मुसळधार पाऊस पडल्यामुळे जमीनीत पाणी मुरले आहे. परिणामी मोहोर येणार्‍या झाडांना पुन्हा पालवी फुटेल. महिन्याभरापुर्वी असाच अवकाळी पाऊस पडल्याने पालवी आली. ती तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे. पुन्हा अवकाळी पावसाने गोंधळ घातला आहे. जी झाडे मोहोर येण्यायोग्य आहेत, त्यांना पुन्हा पालवी फुटू शकते. बदलत्या वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव मोहोरासह पालवीवर होऊ शकतो. त्यासाठी सातत्याने किटकनाशकांचा वापर केल्यामुळे खर्च वाढणार आहे. आर्थिक भाार शेतकर्‍यांवर पडणार आहे. यामधून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने हातभार लावावा अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. फवारणीसाठी एका झाडाला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा त्यात भर पडेल.