अल्पवयीन मुलीशी विवाह; १० वर्षे कारावास

बालविवाहाचाही गुन्हा ;दोघाचे आई-वडील निर्दोष

रत्नागिरी:-राजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीशी तरूणाने शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तरूणाने तिच्याशी लग्न केले. या प्रकरणी आरोपीला (पोस्को) विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

प्रशांत मारुती गुरव (२७, रा. राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे वडील मारुती गुरव (५१), आई मनिषा गुरव (४७, दोन्ही रा. राजापूर) आणि पीडितेचे आई-वडील या चौघांनी त्या दोघांचे लग्न लावून दिल्याचे शाबित झाले नाही. न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. ही घटना ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत घडली आहे. प्रशांतची पीडितेशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत त्याने ६ महिने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती झाळ्याची बाब आरोपी प्रशांत व पीडितेच्या आई-वडिलांना समजताच त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार न देता १ एप्रिल २०२१ रोजी दोघांचे लग्न लावून दिले. दरम्यान, पीडितेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असता ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यावरून राजापूर पोलिस ठाण्यात प्रशांत विरोधात भादंविक कलम ३७६ व पोस्कोअंतर्गत कलम (४) (८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दोघांच्याही आई-वडिलांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम ६ चे कलम (९) व (११) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा खटला गेले काही महिने न्यायालयात सुरू होता. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले असून त्यांनी ४ साक्षीदार तपासून केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानला. या प्रकरणी निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपी प्रशांतला १० वर्ष कारावास आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच आरोपी आणि पीडितेच्या आई-वडिलांची त्यांनी या दोघांचं लग्न लावून दिल्याचे शाबित न झाल्याने मुक्तता केली.