हिवताप विभागाचे कर्मचारी करणार आक्रोश आंदोलन

रत्नागिरी:-हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने निर्गमित केलेली अधिसूचना निर्गमित तारखेपासून लागू झाली आहे. या अधिसूचनेत सुधारणा व्हावी या मागणीसाठी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे 30 नोव्हेंबरला जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलनाद्वारे निषेध केला जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिपत्त्याखालील आयुक्त सेवा संचलनालयाचे नियंत्रणातील हिवताप विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, बहुविध आरोग्य सहाय्यक व क्षेत्र कर्मचाऱ्यांचे पदोन्नती साखळीतील पदाची अस्थित्वात असलेली शैक्षणिक पात्रता शासनाने 29-9-2021 च्या अधिसूचनेनुसार वाढविली. अधिसूचना निर्गमित तारखेपासून लागू झाली असल्याने पदोन्नतीस पात्र कर्मचारी वरिष्ठ पदावरील पदोन्नतीपासून वंचित झाले. हिवताप योजनेतील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे. याबाबत वेळोवेळी संघटनेकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अद्याप कोणताही सकारात्मक विचार शासनाकडून झालेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून शासन, प्रशासन भुलथापा देत आहे. त्यामुळे मागण्यांच्या पुर्ततेसाठी 30 नोव्हेंबर रोजी पस्तावित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर कर्मचारी आंदोलन करणार आहेत. रत्नागिरी जिल्हा राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटना देखील यादिवशी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे हिवताप अधिकारी कार्यालयासमोर दु. 1 ते 3 वा. शासनाचे धोरणाचा निषेध नोंदवून आक्रोश आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची योग्य दखल न घेतल्यास 14 डिसेंबरपासून लेखनीबंद आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत मागणीवर योग्य निर्णय होणार नाही, तोपर्यंत लढा कायम राहणार असल्याचे अध्यक्ष डी.डी.कदम व सरचिटणीस एस.एस.कांबळे यांनी सांगितले आले.