यंदाचा हापूस हंगाम केवळ शंभर दिवसांचाच

रत्नागिरी:- मागील दोन वर्षे हापूसला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे लावलेले निर्बंध आणि नंतर वादळ व पावसाचा फटका, तर यंदा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे कोकणच्या हापूसची मुंबईवारी लांबणार आहे. त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम केवळ 100 दिवसांचा असेल, अशी बिकट स्थिती आहे.

हापूसच्या सुरुवातीच्या हंगामाला पहिला फटका काही फोटी रुपयांत बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे ज्या झाडांना कणी धरली होती ते हापूस आंबे काळे पडून खाली पडले. शिवाय फुलोरा झालेल्या झाडांना बुरशी रोग येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता दररोज आंबा उत्पादक शेतकर्‍यांना फवारणी करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांसह हापूसच्या बागा घेतलेल्या व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.
यंदा 15 ते 20 फेब्रुवारीपासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल, अशी स्थिती होती. मोहोराला चांगली सुरुवात झाली होती. मात्र अवकाळी पावसाचा तडका बसल्याने मोहोर गळून पडण्याचे प्रमाण आहे.
20 ते 25 एकर बागेचा फवारणीचा खर्च हा 70 हजार रूपये येतो. फवारणी औषधाचा दर सुमारे सहा हजार रूपये लिटर असल्याने महागाईचा चटका सोसत संकटाला सामोरे जाण्याची वेळ आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापर्‍यांवर आली आहे. सुमारे 225 हून अधिक घाउक व्यापर्‍यांनी हापूसच्या बागा आधीच विकत घेतल्या आहेत. महागाची फवारणी केल्यानंतरही किती उत्पादन होईल, हे आता सांगणे अशक्य असल्याचे बागा बागायतदार यांचे म्हणणे आहे.