किनारपट्टी भागासह जिल्ह्यात साडेसात हजार सीसीटीव्ही बसवणार: पोलीस उपमहानिरीक्षक मोहिते 

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या किनारपट्टी भागावर लक्ष केंद्रित करण्यासह जिल्ह्यातील प्रत्येक बारीक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाभरात साडेसात हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी डीपीसी, नगर परिषद आणि स्थानिक लोकांची मदत घेण्यात येईल अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी श्री.मोहिते रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 18 पोलीस स्थानकांच्या अंतर्गत कॅमेरे बसविण्याची योजना पूर्ण केली जाणार आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन, नगर परिषद आणि स्थानिक जनतेच्या सहकार्यातून ही योजना पूर्ण केली जाणार आहे. याचा परिपूर्ण आराखडा पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. येत्या काही महिन्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असा विश्‍वास श्री.मोहिते यांनी व्यक्त केला.

अंमली पदार्थासह गांज्याची विक्री रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. गांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु गांजा, अंमलीपदार्थ जेथून येतात त्या मुळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे अशा सूचना आपण जिल्हा पोलिसांना दिल्या आहेत. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने 15 दिवस मोहीम राबवून अंमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करावे असे आदेशही आपण पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी दिल्याचे श्री.मोहिते यांनी सांगितले.

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे अतिरेकी घुसल्याच्या शक्यतेने सर्च ऑपरेशन करण्यात आले. तब्बल तीन ते चार दिवस पोलिसांनी परिसर पिंजून काढला. परंतु यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ज्या गाड्या संशयास्पद होत्या असे सांगण्यात आले त्या गाड्या लग्नासाठी आलेल्या होत्या असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.  आलेली माहिती सत्य समजून पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यामुळे जनतेमध्ये जनजागृती झाल्याचेही श्री.मोहिते यांनी सांगितले.