मारुती आळीतील अनधिकृत बांधकाम नगरपालिकेने तोडले

रत्नागिरी:- शहरातील मारुती आळी येथे गटारावर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आणि खोदण्यात आलेली बोरिंगवर रनपने धडक कारवाई केली. आरोग्य सभापती निमेश नायर यांनी जेसीबीच्या मदतीने या दोन्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत संबंधित व्यावसायिकाला दणका दिला. 

शहरातील बाजरपेठेत पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी भरल्यावर नगरपालिकेवर ठपका ठेवण्यात येतो. मात्र अनेक दुकानदारांनी गटारावर पक्के बांधकाम केल्याने नित्याने गटारांची साफसफाई करता येत नाही हे देखील एक कारण आहे. दहा दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने देखील गोखले नाक्यावर पाणी भरले. याची तत्काळ दखल घेत नगराध्यक्ष बंड्या साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी मारुती आळीतील गटाराचे काम युद्धपातळीवर सुरू केले. याच ठिकाणी असणाऱ्या एका गटारावर एका इमारतीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून रस्त्याच्या जागेत बोरिंग देखील मारण्यात आल्याचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे अनेक वर्षात या गटाराची साफसफाई झाली नसल्याची तक्रार येथील दुकानदारांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत गटारे साफ करण्यासाठी अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि आरोग्य सभापती निमेश नायर यांनी अतिक्रमण विभागाला दिल्या. यानुसार तत्काळ जेसीबी नेऊन हे बांधकाम तोडण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती निमेश नायर,  नगरसेवक राजेश तोडणकर व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.