रत्नागिरी:- जिल्ह्यातून हापूस वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मंडणगड तालुक्याला मिळाला आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथून चार डझन हापूसच्या चार पेट्या वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
फौजान शरीफ खिशे यांच्या बागेतील हा आंबा आहे. वाशी मार्केटला या हंगामात आंबा पाठवणारे जिल्ह्यातील हे पहिले बागायतदार ठरले आहेत.बाणकोटचे बागायतदार फौजान खिशे यशस्वी ठरले आहेत. यंदा हापूस हंगामात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हापूसच्या चार पेट्या बाजारात गेल्या आहेत. एवढ्या लवकर आंबा तयार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. फौजान खिशे यांच्या बाणकोट येथील राहत्या घरामागील चार झाडांवर ऑगस्ट महिन्यात मोहर आला होता. याच कालावधीत पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. घराजवळ झाडे असल्यामुळे लवकर आंबा तयार होण्यासाठी फौजान यांनी काळजी घेण्यास सुरूवात केली हाेती.