पाणीटंचाईचे तालुका आराखडे बनविण्यास आरंभ

जिल्हा परिषदेकडून सुचना; डिसेंबरअखेरीस जिल्ह्याचा आराखडा

रत्नागिरी:– पाणीटंचाईचा आराखडा लवकरात लवकर तयार करावा अशा सुचना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पंचायत समित्यांना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन तालुक्यांचा आराखडा जिल्हा परिषदेला पाठवायचे आहे. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात येणार आहे. गतवर्षी रत्नागिरी तालुक्याचा अहवाल उशिराने आल्यामुळे जिल्ह्याचा आराखडा बनविण्यास विलंब झालेला होता.

जिल्ह्यात मार्च महिन्यात पाणी टंचाई जाणवण्यास सुरवात होते. यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे टँकरने पाणी सुरु करण्यासाठी विलंब होईल, असा अंदाज आहे. तरीही डिसेंबर अखेरपर्यंत टंचाई आराखडा तयार केला जाणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ऐन टंचाई कालावधीत टँकरचे नियोजन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती. तालुक्याचा आराखडा जिल्हा परिषदेकडे पोचेपर्यंत जानेवारी उजाडला होता. जिल्ह्याचा आराखडा मंजूरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उशिर झाला होता. सुदैवाने टँकरची मागणी उशिराने झाली. मात्र यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद पाणी पुरठाव विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. तालुक्याचे आराखडे तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून त्यामध्ये टंचाईचा आराखडा बनवायचा असतो. पुढील आठ दिवसात राजापूर, लांजा, गुहागरमधील बैठका होणार आहेत. त्यांच्याकडून आराखडात लवकर मिळू शकतो. गतवर्षी रत्नागिरी तालुक्याचा आराखडा उशिराने गेला होता. तसे होऊ नये यादृष्टीने सुचना देण्यात आल्या आहेत.