जिल्ह्यात 1 लाख 48 हजार जण कोविड लसीकरणाविना 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने सुरु असून आतापर्यंत १० लाख ८१ हजार ९०० पैकी ९ लाख ३३ हजार ६४९ जणांनी पहिला तर ४ लाख १२ हजार ७६१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १ लाख ४८ हजार लोकांनी अजुनही पहिला डोस घेतलेला नाही. हे लक्ष शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तक मोहीम हाती घेण्यात आली असून घरोघरी लसीकरणावर भर देण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आला असला तरीही तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाने कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख ७२ हजार ३७३ आहे. त्यातील १८ वर्षांवरील लोकसंख्या १० लाख ८१ हजार ९०० आहे. आतापर्यंत ८६.३० टक्के लोकांनी पहिला तर ३८.१५ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. संगमेश्‍वर तालुक्यात प्रभावी माहिती राबविण्यात येत असून ९७.६८ टक्के लोकांनी पहिला डोस तर ४६.६९ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यापाठोपाठ खेड तालुक्याचा क्रमांक लागतो. लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा पर्याय निवडला आहे.

अंगणवाडीसेविका, आशा वर्कस्, आरोग्य सेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन लस घेणार्‍यांची माहिती घेतली जात आहे. हर घर दस्तक मोहीमेंतर्ग लस न घेणार्‍यांसाठी गावस्तरावर शिबिरांचे आयोजन केले जात आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी शिल्लक राहिलेल्या १ लाख ४८ हजार लोकांनी जिल्हा प्रशासनाने लक्ष्य निश्‍चित केले आहे. प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हाप्रशासन घेत आहे.