मिऱ्या समुद्रकिनारी महाकाय मासा आढळला मृतावस्थेत

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकिमिर्‍या गावातील पाटीलवाडी येथे शनिवारी (ता. 20) सकाळी समुद्र किनार्‍यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. सुमारे 25 फुटाहून अधिक लांबीचा महाकाय व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कुजलेल्या अवस्थेत किनार्‍यावर लागलेल्या व्हेलचा मृत्यू
काही दिवसांपुर्वी झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोकण किनारपट्टीवर व्हेलचा वावर वाढल्याचा अंदाज गेले काही महिने अभ्यासकांकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यात जाकिमिर्‍या येथील सापडलेल्या व्हेलीच भर पडली आहे. पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय व्हेल मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला. सुरवातीला तो पाण्यात दिसून आला. लाटांबरोबर तो वाळूत आला. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या माशांची लांबी 25 फुट असून त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता. मृतावस्थेत तो वाहत मिर्‍या किनार्‍यावर लागला. काही दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झालेला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते. त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. किनार्‍यावरील वाळूतच मोठा खड्डा खोदून त्याला पुरण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळेसह राजापूर, दापोलीतील मुरुड येथेही महाकाय मृत आढळून आले होते.

विविध कारणांसाठी  व्हेलची शिकार वाढल्यामुळे जागतिकस्तरावरील त्याची संख्या घटत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्याची लांबी 30 फुटापर्यंत असते. तसेच 10 ते 30 हजार व्हेल मासेच समुद्रात असल्याचा अंदाज आहे. व्हेल माशाच्या उलटीला कोटी रुपयांच्या घरात किंमत मिळते. त्या उलटीची तस्करी केली जाते. गेल्या काही महिन्यात कोकणात तीन ठिकाणी उलटीची तस्करी केल्याचे प्रकार उघड झाले. म्हाकुळ मासा हे व्हेलचे मुख्य खाद्य असल्याने तो कोकण किनारपट्टीवर आढळून येतो.