अवकाळी पावसाने आंबा पीक धोक्यात 

रत्नागिरी:- हवामान विभागाच्या सुचनेनुसार रत्नागिरी, खेड तालुक्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला; मात्र दापोली, मंडणगडात ढगाळ वातावरण होते तर चिपळूण, संगमेश्‍वरसह लांजा-राजापूरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सायंकाळी एक तास पडलेल्या पावसाने रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे तुळशी विवाहाच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले. तसेच सततच्या पावसाने आंबा मोहोराचे नुकसान होणार असून फवारणीचा खर्चही वाढणार आहे.

बंगालच्या उपसागारत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. 16) दिवसभर पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. उष्माही वाढल्याने पावसाची स्थिती होती. दुपारी अचानक कडकडीत उन पडले. मात्र सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. सुमारे एक तास हा पाऊस पडत होता. ठिकठिकाणी रस्त्यावरुन पाण्याचे ओहोळ वाहताना दिसत होते. रत्नागिरी शहरात काही परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीला त्रास झाला. गणपतीपुळे पर्यटनस्थळी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली. किनार्‍यावर फिरणार्‍यांचा हिरमोड झाला. रत्नागिरी तालुक्यात सगळीकडेच पावसाचा तडाखा बसला होता. तासभरानंतर पावसाने विश्रांती घेतली, पण त्यानंतर पुन्हा संततधार सुरु झाली. वीजांचा कडकडाट सुरु झाल्यामुळे रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा काहीकाळ खंडित करण्यात आला होता.

एकादशीनंतर गावोगावी तुळशी विवाह लावले जातात. मंगळवारपासून ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते; परंतु सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने त्यावर पाणी फेरले. वाडी-वस्तीमधील ग्रामस्थ एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरोघरी जात तुळशी विवाह लावतात. पावसामुळे घाईगडबडीत हा कार्यक्रम राबविला गेला. काहींनी पावसाने विश्रांती घेतली तेवढ्या कालावधीत कायक्रम उरकुन घेतला. पावसामुळे फटक्यांची आतषबाजी करता आलेली नाही. रत्नागिरी व खेड तालुका वगळता अन्य चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूरसह लांज्यात पावसाने हजेरी लावली होती. खेडमध्ये सायंकळी सव्वा सहा वाजल्यानंतर वेगवान वार्‍यासह पावसाला सुरवात झाली. राजापूरात अवघा दहा मिनिटे पाऊस झाला. तर मंडगणड, दापोलीत ढगाळ वातावरण होते.