तरुणांचा मतदार यादीतील समावेश केवळ सव्वा टक्के

रत्नागिरी:- राज्याच्या आढाव्यामध्ये ४ लाख दुबार मतदार असल्याचे पुढे आले. त्याची बीएलओ मार्फत तपासणी करून त्यामध्ये दुरूस्ती करण्यात आली. तरी अजून १३ हजार दुबारमतदार आहेत. चिंतेची बाब ही आहे की, १८ ते २९ वयोगटातील तरुणांची मतदार यादीतील संख्या साडे तीन टक्के अपेक्षीत आहे. ती फक्त सव्वा टक्केच आहे. तर १९ ते २९ वयोगटातील तरुणांचा मतदार यादीमध्ये १८ टक्के समावेश अपेक्षीत आहे, तो १३ टक्के आहे. लोकशाहीच्या पहिल्या पायरीबाबत युवक वर्ग उदासिन असल्याची गंभीरबाब यातुन दिसुन येते. त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे, अशी चिंता प्राधन सचिव तथा मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

राज्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानिमित्ताने जिल्हा नियाहय त्यांचे दौरे सुरू आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व अन्य अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची निरंतर प्रक्रिया आहे. यामध्ये १८ वर्षे पुर्ण झालेल्यांची १ जानेवारी २०२२ च्या मतदार यादीमध्ये समावेश होणार आहे. प्रारुपयादी १ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ ते ३० नोव्हेंबर पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष मोहिम १३ ते १४ आणि २७ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. तसेच १६ नोव्हेंबरला प्रत्येक विशेष ग्रामसभांचा कार्यक्रम राबवून मतदार यादीचे चावडी वाचन होणार आहेत. त्यानंतर मतदारांनी नवीन नोंदणी, छायाचित्राचा समावेश, नावामध्ये बदल किंवा चुक झाल्यास ती दुरूस्ती मतदारांनी करून घ्यावी.  

राज्यात अजूनही २८ लाख मतदार ओळखपत्र अशी आहेत, की त्यांच्यावर मतदाराचे छायाचित्र नाही. त्यामुळे आम्ही यंत्रणा कामाला लावून १ लाख ८५ हजार छायाचित्र गोळा केली. १८ लाख पत्त्यावर राहणाऱ्यांना नोटिस पाठविण्यात आली. नोटिस न स्विकारल्यास ती परत येतात. त्यामुळे त्या पत्त्यावर ती व्यक्ती राहात नसल्याची खात्री करून ही १८ लाख नावे कमी करण्यात आली. ९ लाख मतदार असे आहेत, की त्यांच्या मतदान ओळखपत्रावर अजून छायाचित्र नाही. त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करण्यासाठी ओटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्यावर आपल्या नावाची खात्री करा. मतदार यादीमध्ये १८ ते २९ वयाच्या युवक मतदारांचा टक्का साडे तीन टक्के असतो. तो  सव्वा टक्केच दिसत आहे. तर १९ ते २९ वयाच्या युवकांची मतदार यादीतील टक्का १८ टक्के हवा आहे. तो आता १३ टक्केच दिसत आहे. मतदान ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. मात्र युवक टक्केवारी पाहता युवक वर्गांमध्ये याबाबत उदासिनता दिसत असून ती चिंतेची बाब आहे. राज्यात ४ लाख दिव्यांग आहेत. मात्र मतदार यादीमध्ये फक्त ६९ हजार जणांची नोंद आहे. त्यामुळे दिव्यांगांची मतदार यादीमध्ये नोंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.