दिवाळीच्या खरेदीने बाजारपेठेला नवी झळाळी; मोजक्या दिवसात कोट्यावधींची उलाढाल

रत्नागिरी:- कोरोनाबाधितांची आटोक्यात आलेली संख्या आणि शासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठेत गेले आठवडाभर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड झाली आहे. शोभिवंत वस्तू, सजावटीचे साहित्य तसेच आकाशकंदिल, मेवामिठाई, नवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, रेडिमेड फराळ खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी पहायला मिळाली. दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. 

कोरोना काळात अनेक महिने बंद असणारी दुकाने गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर सुरू झाली आणि व्यापाऱ्यांना हायसे वाटले. त्या काळात मोठी उलाढाल झाली. त्यानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळीसाठी पुन्हा एकदा बाजाराला बूस्टर डोस मिळाला आहे. आजच अनेक नोकरदारांचे पगार आणि बोनस झाल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीत भर पडली.
दिवाळीमध्ये घरोघरी फराळ करण्यात येत असला तरी सणासुदीला मिठाईची खरेदीही आवर्जून केली जाते. त्यामुळे बाजारात नवनवीन प्रकारच्या मिठाई विक्रीला आल्या आहेत. दीपावलीनिमित्त बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. नवे कपडे, फटाके याबरोबरच फराळाचे तयार जिन्नस, मिठाईची खरेदी आवर्जून केली जात आहे.

काही खासगी आस्थापना दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचार्‍यांना सुका मेवा अथवा मिठाईचे बॉक्स भेट देतात. त्यामुळे बाजारात मिठाईचे विविध प्रकार व सुका मेवा आकर्षक बॉक्ससह विक्रीला ठेवण्यात आले आहेत. पारंपरिक मिठाईसोबत नवीन प्रकारातील मिठाई दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सध्या रेडिमेडचा जमाना असल्यामुळे तयार कपड्यांनाच अधिक मागणी आहे. युवावर्गाचा कल तयार कपड्यांकडे अधिक आहे. पुरुषांसाठी तयार शर्ट, पॅन्ट, कुर्ता, पायजमा बाजारात उपलब्ध आहेत. शर्ट, कुर्तामध्ये तर अनेक व्हरायटी आहेत. शर्टपेक्षा टी-शर्टला सर्वाधिक पसंती आहे.