त्या बेपत्ता नौकेला मालवाहू जहाजाची धडक? 

रत्नागिरी:- जयगड येथील नावेद मच्छीमारी नौकेला मालवाहू जहाजाने धडक दिल्याची चर्चा जयगड परिसरात सुरु होती. त्या बाजूनेही पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. अजुनही त्या नौकेचा शोध सुरुच असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जयगड येथील नावेद मच्छीमारी नौका मागील आठवड्यात बेपत्ता झाली होती. मासेमारीसाठी गेल्यानंतर ती बंदरात परत न आल्यामुळे मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गेले आठ दिवस तटरक्षकदल, पोलिस आणि मत्स्य विभागाकडून शोध मोहिम सुरु आहे. आतापर्यंत नौकेवरील सहा खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. मंगळवारी (ता. 2) सायंकाळी नावेद नौकेवरील मासे साठवण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टीकचा टब वीस वावात आढळून आला. तो शोध पथकाने ताब्यात घेतला आहे. यावरुन त्या नौकेला अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने तपास सुरु झाला आहे. त्या नौकेला एखाद्या मालवाहू जहाजाची धडक बसली असावी अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थ आणि मच्छीमारांमध्ये सुरु होती; परंतु त्यासंदर्भात ठोस माहिती पुढे आलेली नाही. याचा आधार घेऊन पोलिसांकडून तपास करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.