पंधराव्या वित्तसह जलजीवन मिशनचे आराखडे लवकर तयार करा: रोहन बने

रत्नागिरी:- पंधराव्या वित्त आयोगाचा आराखडा, जल जीवन मिशनचे आराखडे लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य रोहन सुभाष बने यांनी कोसुंब प्रभाग समिती बैठकीत दिल्या आहेत.


कोसुंब येथे आयोजित केलेल्या प्रभाग समितीच्या आढावा बैठकीला सभापती सारिका किरण जाधव, एच. बी. गिरी आदी उपस्थितीत होते. यावेळी विविध विकासकामांचा आढावा श्री. बने यांनी घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना रोहन यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्येही जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामे मंजूर करुन घेण्यासाठी पाठपुरावा केला. पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामांचा आराखडा तयार केला तर त्यातील अनेक कामे पुढील पावसाळा येण्यापुर्वी सुरु करता येतील. त्यासाठी आराखडा बनवणे आवश्यक आहे. त्यानंतर तो मंजूर होऊन पुढील कार्यवाही तत्काळ करता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत घराघरात नळ जोडणी दिली जाणार आहे.

त्यासाठी आराखडा बनविण्याच्या सुचना दिल्या आहेत. युवा स्वास्थ्य मिशनमध्ये जास्तीजास्त मुलांचा सहभाग होण्यासाठी आव्हान केले तसेच विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच कोविड कालावधीत कोसुंब गटातील सर्वांनी एकत्र येऊन दिलेल्या योगदानाबद्दल प्रभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्राम कृती दलातील सर्व सदस्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यता आले. कोसुंब प्रभागातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, संबंधित केंद्र. अंगणवाडी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रभाग समन्वयक, प्रभाग व्यवस्थापक, सत्यवान ( भाई ) शिंदे, मुन्ना थरवळ, अशोक पवार, अरुण चाळके, सुभाष सावंत यांसारखे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.