पेट्रोल-डिझेल दरवाईचा फटका; महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे

रत्नागिरी:- या महिन्यात पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनात तर भरमसाठ वाढ झालेलीच आहे पण भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. कांदा, टोमॅटो यांच्या भावातही वाढ झाली आहे. त्यातच कोथिंबीरचा भाव चांगलाच वाढला आहे. रत्नागिरीच्या मार्केटमध्ये कोथिंबीर 60 रुपये जुडीने विकली जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांबरोबरच, मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे.

रत्नागिरीत कांदे आधी 30 रुपये प्रति किलो होते ते आता 50 रुपये किलो झाले आहेत. बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो आधी 20 प्रति किलो होते ते आता थेट 60 रुपये किलो झाले आहेत.प्रत्येक भाज्यांमागे 30 ते 40 रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.

गतमहिन्यात शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये प्रति किलो मिळायची त्याचा दर आता 100 रुपये प्रति किलो झाला आहे. वांगी 40 रुपये प्रतिकिलो मिळायची त्याचा दरही 80 रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच गवार 40 रुपये प्रति किलो दराने मिळायची त्याचा दर आता 80 रुपये प्रति किलो झाला आहे. भेंडी 30 रुपये प्रति किलोने मिळत होती त्याचा दर 80 रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. शिवाय कोथिंबीरही 20 रुपये प्रति जुडी मिळत होती. त्याचा दर आता 60 रुपये प्रति जुडी झाला आहे.
दिवाळीच्या अगदी आधी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भाज्यांची लागवड पावसात खराब झाली आहे. बाजारात भाज्या कमी येत असल्यामुळे महागही झाल्या आहेत. टोमॅटोची किंमत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या बरोबरीने केली जात आहे. अशा परिस्थितीत खायचं तरी काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.