रत्नागिरीचा हापूस थेट गाठणार रशिया; पणन मंडळाचा पुढाकार 

रत्नागिरी:- रत्नागिरी हापूसला रशिया बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी पणन महामंडळाने निर्यातदार आणि रत्नागिरी, देवगडमधील बागायतदार यांच्यात चर्चा घडवून आणली. महिन्याला 30 टन हापूस निर्यातीसाठी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी करण्यात आली असून दोन्ही जिल्ह्यातील बागायतदारांनी तशी तयारीही दर्शवली आहे.

पणन मंडळाच्या कार्यालयात नुकतीच निर्यातदार अ‍ॅन्ड्रीव्ह कॉस्टीव्ह यांच्याशी स्थानिक बागायतदारांनी चर्चा केली. यावेळी पणनचे सहसर व्यवस्थापक मिलिंद जोशी, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सचिन लांजेकर, सलील दामले, गौरव सुर्वे यांच्यासह देवगडचे काही बागायतदार उपस्थित होते. या बैठकीत अ‍ॅन्ड्रीव्ह हे फळ उद्योगात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. रशियामध्ये विविध फळांची भारतामधून ते निर्यात करतात. महिन्याला तीस टन हापूस रशियात नेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. फळमाशी मुक्त हापूस अपेक्षित असल्यामुळे त्यांवर त्यादृष्टीने प्रक्रिया झाली पाहीजे. त्यासाठी उष्णजल प्रक्रिया किंवा बाष्पजल प्रक्रियेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. अ‍ॅन्ड्रीव्ह त्यादृष्टीने सकारात्मक आहेत. स्थनिक बागायतदारांकडूनही दर्जेदार आंबा उपलब्ध करुन देण्याची तयारी असल्याचे सांगितले. वातावरणातील बदलानुसार उत्पादन मिळते. स्थानिक बाजारपेठेतील दर, येणारा खर्च यावर निर्यातीचे दर ठरवले जातात. दर हे त्या-त्या परिस्थितीनुसार निश्‍चित करू अशी सूचना केली.

हापूसची महती सातासमुद्रापार पोचल्यामुळे अनेक निर्यातदार कोकणातील स्थानिक शेतकर्‍यांशी संवाद साधण्यास उत्सुक आहेत. पूर्वी मुंबई, पुणे, अहमदाबादच्या बाजार समितीमधील व्यापारी हापूसची निर्यात करत होते. शासनाने दलाली बंद करुन थेट शेतकर्‍यांच्या शिवारात व्यापार्‍यांना पाठवण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी पणन मंडळाने गेल्या पाच वर्षात शेतकरी, निर्यातदार यांची वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी केली होती. गेल्या काही वर्षात थोड्याफार प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यातून रशियाला आंबा पाठवण्यात आला आहे. थेट शेतकर्‍याच्या बागेतून मोठ्या प्रमाणात हापूस रशियाला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. हापूसचा हंगाम सुरू होण्यासाठी अजून अवकाश असला तरीही यंदा निर्यातीवर भर देण्यासाठी पणन, कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. त्याची पहिली पायरी म्हणून रत्नागिरीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच पावले उचलण्यात आली आहे.