ओबीसी महिलांना राजकीय आरक्षण पुन्हा द्या

ओबीसी संघर्ष समिती बैठक; तर जनगणनेवर बहिष्कार!

रत्नागिरी:- ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी सरकारला भाग पाडणे आवश्यक आहे. यावर्षीच्या जनगणनेत ओबीसींचा रकाना नसल्यास बहिष्कार टाकण्यात येईल. तसेच ओबीसी महिलांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्धार रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या महिलांच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी रत्नागिरी शहर महिला ओबीसी संघर्ष समिती अध्यक्षपदी शरयु गोताड यांची निवड करण्यात आली.

रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समीतीच्या महिला कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सायंकाळी जिल्हा नगर वाचनालय रत्नागिरी येथे झाली. बैठकीला ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजीव कीर, शहर अध्यक्ष मुन्ना चवंडे, तेली समाज जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, खजिनदार रुपेंद्र शिवलकर, पं.स.सदस्या साक्षी रावणंग, सुरेंद्र घुडे, प्रवीण रुमडे, दादा ढेकणे, प्रवीण रायकर, प्रिया प्रशांत बंदरकर, रूचा दीपक राऊत इत्यादी ओबीसी बंधु भगिनी उपस्थित होते.
गेले चार महिने रत्नागिरी तालुक्यात चाललेला ओबीसी संघर्ष समितीचा आढावा  तालुका उपाध्यक्ष राजीव कीर यांनी घेतला. संघर्ष समितीला शहरातून पूर्ण ताकदीने सहकार्य करण्याचे आश्वासन शहराध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी दिले. ओबीसी महिलांचे एकीकरण करणे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारला भाग पाडणे का आवश्यक आहे याबाबत साक्षी रावणंग यांनी माहिती दिली. ओबीसींचे शैक्षणिक आरक्षण मिळावे, मागासवर्गीय भगिनींप्रमाणे ओबीसी महिला बचत गट यांना लाभ मिळावा तसेच शासनाचे ओबीसीना हक्क आणि अधिकार पाहिजे असतील संघटित  होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  याप्रसंगी सूत्रसंचालन रघुवीर शेलार तर तनया शिवलकर यांनी आभार मानले.