भात खरेदीसाठी प्रति क्विंटल 1 हजार 868 रुपयांचा दर 

यावर्षी 53 रुपयांची वाढ; लवकरच भात खरेदी प्रक्रिया 

रत्नागिरी:-  दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करीत आहे. यावर्षी शासनाने १८६८ रूपये प्रति क्विंटल दराने भात खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी क्विंटलमागे ५३ रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. सध्या भात कापणी सुरू आहे. मात्र जिल्ह्यात लवकरच भात खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासन ठरवून देईल त्या दराने शेतमाल खरेदी करण्यात येतो. यावर्षी भातासाठी दर जाहीर झाला असून, धान्य खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांची लवकरच परवानगी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी भात खरेदीला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद लाभतो. सन २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती.

जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटीतर्फे धान्य खरेदी करण्यात येते.  खेड, दापोली, केळशी, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, पाचल, चिपळूण, मिरवणे, आकले, शिरगाव, शिरळ अशा १४ केंद्रावर भात खरेदी करण्यात येते.   यावर्षी फेडरेशनतर्फे दोन केंद्रे वाढवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. खरेदी केलेला भात जिल्हा पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात येवून त्यानंतर भात भरडण्यासाठी निविदा काढण्यात येते. भात भरडल्यानंतर तयार झालेला तांदूळ जिल्ह्यातील रास्त दर धान्य दुकानात विक्रीसाठी वितरीत करण्यात येतो.

दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. शेतकरी स्वत:पुरता भात ठेवून अधिकचा भात विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांना भात विक्रीतून चांगले अर्थाजन प्राप्त होत आहे. सध्या भात कापणी सुरू असल्याने लवकरच खरेदी सुरू केली जाणार असल्याची माहिती दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन शाखा रत्नागिरीचे पी.जे.चिले यांनी दिली.