जिल्ह्यात वीस टक्के भात कापणी पूर्ण 

रत्नागिरी:- घटस्थापनेच्या मुहूर्ता मुसळधार पावसाने सुरवात केल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणी लागला होता; मात्र गेल्या चार दिवसात कडकडीत उन पडल्यामुळे हळव्या तयार भाताची कापणी वेगाने सुरु झाली आहे. जिल्ह्यात सुमारे वीस टक्के कापणी पूर्ण झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला परतीच्या पावसाला सुरवात झाली. दिवसभर कडकडीत उन आणि सायंकाळी पाऊस अशी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात आहे. चिपळूण, संगमेश्‍वर, खेड भागात तर ढगफुटीसारखा पाऊस सायंकाळच्या सत्रात कोसळत होता. ऑक्टोबर महिन्यात सुमारे चार हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पावसामुळे गणपतीनंतर तयार झालेल्या हळव्या जातीची भात पिकांची कापणी रखडली. पाऊस कायम राहीला तर पडलेल्या लोंब्यांना पून्हा मोड येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त केली होती. जिल्ह्यात यंदा 70 हजार हेक्टरवर भात लागवड झाली. त्यातील हळव्या जातीची दहा टक्के बियाणे असून उर्वरित निमगरवी आणि गरवी पिकं आहेत. परतीचा पाऊस गेल्यानंतर तयार भातांच्या कापणीला जिल्ह्यात वेग आला आहे. यंदाच्या हंगामात पुराच्या पाण्यामुळे किनारी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे; मात्र उर्वरित भागातील उत्पादन चांगले येण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
ऑक्टोबर हिटचा तडाखा रत्नागिरीकरांना जाणवू लागला आहे. पारा 33 अंशावर सरकला असून किमान तापमान 22 अंशापर्यंत येते. दुपारच्या सुमारास उन्हाच्या कडाक्यामुळे रत्नागिरीकरही बाहेर पडणे टाळत आहेत. सरबत, उसाचा रस यासारख्या थंड पेयांकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे.