किनारपट्टी भागात जेलिफिशचा वावर; मच्छीमार मोठ्या संकटात 

रत्नागिरी:- रत्नागिरी  गणपतीपुळे, जयगडपर्यंतच्या किनारी भागात जेलीफिशचा आढळ वाढल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणार्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाळी फाटण्याच्या भितीने अनेकांनी मासेमारी थांबवली आहे. तर खोल समुद्रात जाणार्‍या पर्ससिननेट मच्छीमारांची चंगळ झाली आहे. एका बोटीला 75 हजार ते 1 लाख 10 हजाराची उष्टी बांगडी मिळत आहे.

हंगाम सुरु झाल्यानंतर बिघडलेल्या वातावरणाला सामोरे जात मच्छीमारी सुरु होती. सध्या कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुसळधार पावसामुळे वातावरणात बदल झाला होता. वेगवान वारेही वाहत होती. त्यामुळे मच्छीमारीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यामधून पर्ससिननेटद्वारे मासेमारी करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे. फिशमिलसाठी लागणारी उष्टी बांगडी मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने समाधानाचे वातावरण आहे. 200 ते 300 डिश (एक डिश 32 किलो) मासळी समुद्रात मिळत आहे. काही बोटींना लाखाच्या पुढे मासा मिळतो. पुरवठा वाढल्यामुळे दर घसरला आहे. पंधरा रुपये किलोने विकला जाणार्‍या या माशाला बारा रुपये दर आहे. ट्रॉलींगलाला म्हाकुळ मिळत असले तरीही त्याचे प्रमाण कमी आहे. 210 रुपये किलोला दर मिळत आहे.

पर्ससिननेटसह ट्रॉलिंगला मासा असला तरीही गिलनेटवाल्यांची अडचण झाली आहे. पश्‍चिमेकडून पुर्वेकडे वाहणार्‍या वार्‍यांनी गणपतीपुळे, मिर्‍यासह जयगड किनारी भागात जेलीफिश मोठ्या प्रमाणात आहे. झुंडीने जेलीफिश येत असल्याने जाळी फाटण्याची भिती अनेकांना आहे. काहींचे नुकसानही झाले आहे. महिन्याभरापुर्वी केंड आणि गाद्या माशांच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. बांगडा मासा आला की केंड दिसतो. सध्या बांगड्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किमतीही तिप्पट झाल्या आहेत. जेलीफिशमुळे मिर्‍यासह आजूबाजूच्या छोट्या बंदरांमधील मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले आहे. अनेकांच्या बोटी बंदरातच उभ्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी जेलीफिश दिसू लागतो. महिना दिड महिन्यांनी हा मासा पुढे निघून जातो.