गावागावात मानधन तत्वावर शिक्षक नियुक्तीचा विषय रखडला 

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वर्षाला घेऊन त्यातून मानधन तत्त्वावर गावातील बीएड, डीएड तरुणांना संधी देण्याचा विचार सुरु होता. या विषयावर शिक्षक संघटनांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने नियुक्तीचा विषय बारगळला आहे. याला शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनीही दुजोरा दिला.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये पुर्वीपासून परजिल्ह्यातील लोकांचा भरणा अधिक झाला होता. बराच कालावधी रत्नागिरी जिल्ह्यात काम केल्यामुळे अनेकांनी आपल्या गावाकडे परतण्यास सुरवात केली आहे. जुने शिक्षक सेवा निवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या अधिक होत आहे. शासनाकडून नवीन भरतीकडे कानाडोळा करण्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे हजारावर गेली आहेत. गतवर्षीपासून शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांची प्रक्रियाही थांबविण्यात आली आहे. रिक्त पदांमुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. गेल्या काही दिवसात ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरु झाले आहे; मात्र मोठ्या पटांच्या शाळांमध्ये शिक्षकांची उणिव भासत आहे. यावर उपाययोजना म्हणून शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांच्यासह सदस्यांनी मानधन तत्त्वावर गावातील प्रशिक्षीत तरुणांना शाळांमध्ये शिकवण्यासाठी घेण्यात येणार होते. त्यासाठी लोकसहभाग किंवा शिक्षकांनी स्वतःहून प्रत्येक वर्षाला एक हजार रुपये जमा करायचे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासंदर्भात शिक्षक संघटनांची बैठक सभापतीं मणचेकर यांनी घेतली. त्यावेळी काही शिक्षक संघटनांनी त्याला विरोध केला तर काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संमिश्र प्रतिक्रिया आल्यामुळे गोंधळ होऊ नये यासाठी या प्रस्तावावरील चर्चा थांबविण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये तात्पुरते शिक्षक मिळाले असते अशी प्रतिक्रिया सभापती मणचेकर यांनी व्यक्त केली.

शिक्षकांची रिक्त पदे भरा अशी मागणी शिक्षक संचालकांकडे करण्यात आली असल्याचे सभापती श्री. मणचेकर यांनी सांगितले. पटसंख्येअभावी बंद केलेल्या शाळांमधील शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. ते समायोजन तत्काळ करावे, जेणेकरुन तालुक्यातील रिक्त पदांची संख्या निश्‍चित होईल. तसेच जानेवारी महिन्यात शिक्षक भरती होणार आहे. त्यानंतर मे महिन्यात नवे शिक्षक मिळतील असे आश्‍वासन संचालकांनी दिले आहे.