ना. सामंत यांच्या प्रयत्नाने काळबादेवीतील मासेमारी जेट्टीचे काम सुरू 

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील मासेमारी जेट्टीचे काम सुरू झाले आहे. काळबादेवी गावातील अनेक लहान-मोठ्या मच्छीमार ग्रामस्थांना ही जेटी गरजेची होती. मात्र जेट्टी मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने मच्छीमारांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेत काळबादेवी येथील शिवसेना शाखाप्रमुख संदेश बनप आणि स्थानिक मच्छीमारांनी जेट्टीच्या दुरुस्तीसाठी ना. सामंत यांची भेट घेतली आणि अवघ्या काही महिन्यातच या जेट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. 


 काळबादेवी येथील बहुतांश ग्रामस्थांचा व्यवसाय मासेमारीच आहे. गावातील ग्रामस्थांच्या ट्रॉलनेट, गिलनेट, बिगर यांत्रिक अशा प्रकारच्या नौका आहेत. गावातील पिरदर्गा येथे लहान मासेमारी जेट्टी आहे. अनेक वर्षांच्या उधाणात या जेट्टीचे नुकसान झाले असून ती मोडकळीस आली आहे. जेट्टी मोडकळीला आल्याने गावातील मच्छीमाराना नौका जेटीला लावणे खूप बनले. त्याचबरोबर नौका लावताना अनेक बोटी दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या घटना देखील झाल्या.


 आजूबाजूच्या गावातील मच्छिमार बांधव याच जेट्टीवर मासे गरविण्यासाठी देखील येत असतात . सदर आमची जेटी मजबूत नसल्याने काही मोठ्या नौकांना मासे उतरविण्यसाठी मिरकरवाडा बंदराचा आधार घ्यावा लागतो आणि तेथील स्थानिक काळबादेवीतील नौकांना विरोध करत असल्याचा घटना देखील घडल्या होत्या.


 या पार्श्वभूमीवर काळबादेवी गावातील सेनेचे शाखाप्रमुख संदेश बनप यांच्या नेतृत्वाखाली गावातील मच्छीमार ग्रामस्थांनी उद्योजक किरण सामंत आणि ना. उदय सामंत यांना जेट्टीच्या दुरुस्तीकरिता निवेदन दिले होते. निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच जेट्टीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता ना. सामंत यांनी निधी मंजूर करून आणला असून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे. जेट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात केल्याबद्दल काळबादेवीतील मच्छीमार ग्रामस्थांनी ना. सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांचे आभार मानले आहेत.